गणेशोत्सवाला एसटीने गावी जायचं नियोजन केलंय? प्लॅन फिस्कटू शकतो, कारण संपाचे सावट…

Spread the love

मुंबई : गणेशोत्सवाला दीड महिन्यापेक्षा कमी कालावधी उरल्याने एसटी गाड्या सज्ज ठेवण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उत्सव वाहतुकीवर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे सावट पडण्याची चिन्हे आहेत. कामगार संघटनेने ११ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.

गणपती आणि दिवाळी सणाला एसटीला मोठी मागणी असते. या काळात प्रवासी वाहतुकीतून नफा कमावण्याचे महामंडळाचे नियोजन असते. यंदा मंगळवार, १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. ही संधी हेरून कामगार संघटनांनी प्रवाशांना वेठीस धरून ‘काम बंद’ आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे.

तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ ते २०२० या कालावधीतील चार हजार ८४९ कोटी रुपयांची एकतर्फी पगारवाढ घोषित केली. यातील केवळ एक हजार ८४९ कोटींचेच वाटप केले गेले, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचे म्हणणे आहे.
मागण्यांच्या पूर्ततेसाठी ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची हाक देण्यात आली आहे. १३ सप्टेंबरपर्यंत महामंडळाने आणि सरकारने मागणी पूर्ण केली नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, कामगार संघटनेने उपोषणाची नोटीस दिली असून, याबाबत चर्चेतून तोडगा काढण्यात येईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.

संघटनेच्या २९ मागण्या
जुन्या दरपत्रकाप्रमाणे वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती बंद करून कॅशलेस योजना सुरू करणे, सण अग्रीम १२ हजार ५०० रुपये मिळणे, आयुर्मान पूर्ण झालेल्या बस वाहतुकीतून काढणे, कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत विश्रांतीगृह, सध्याच्या एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह सर्व बसमधून मोफत पास, निवृत्त कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा पास यांसह संघटनेच्या एकूण २९ मागण्या आहेत. महामंडळाकडे देण्यात आलेल्या उपोषणाच्या नोटिशीमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page