रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार…!
राजापूर | डिसेंबर ३१, २०२३.
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात भाजपा नेते, मा. आमदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांचा संपूर्ण मतदारसंघात वादळी प्रवास सुरु आहे. यामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन, नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी जनता दरबार, कार्यकर्त्यांच्या बैठका, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी, पत्रकार परिषद अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. तीन दिवसीय राजापूर दौऱ्यामध्ये दि. २८ डिसेंबर रोजी राजापूर (पू.) भागात तालुकाध्यक्ष श्री. भास्कर सुतार यांच्या साथीने तर दि. २९ व ३० डिसेंबर रोजी राजापूर (प.) मध्ये तालुकाध्यक्ष श्री. सुरेश गुरव यांच्यासोबत संपन्न झालेल्या या प्रवासात ठिकठिकाणी नागरिकांनी उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दि. २९ डिसेंबर रोजी राजापूर शहरात भाजपाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन श्री. प्रमोद जठार यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत “कोकणच्या शाश्वत समृद्धीसाठी आवश्यक रोडमॅप घेऊन मी फिरतोय. कोकणाच्या तरुणाईला काय हवंय, महिला-भगिनींना काय हवंय, विद्यार्थी-व्यावसायिक-नोकरदार वर्गाच्या अपेक्षा काय आहेत हे मी प्रवासात जाणून घेत आहे आणि त्या त्या गोष्टींचे नियोजन करण्यासाठी तातडीने पावले उचलत आहे. मागील १० वर्षांत कोकण ३० वर्षे मागे गेले हे खरे असले तरीही कोकणच्या विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्याचे सामर्थ्य या भूमीत आहे. लोकांना आता रोजगार हवाय, विकास हवाय त्यामुळे विरोधकांनी आता आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे” असा सज्जड इशाराही यावेळी त्यांनी दिला.
“मोदीजींनी रेशन दिले, कोविड काळात आरोग्याची काळजी घेतली, गावागावात पाणी दिले, गॅस सिलेंडर दिले, शेतकऱ्यांना ६००० रुपये भत्ता सुरु केला. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले. अशा शेकडो गोष्टी त्यांनी कर्तव्यभावनेतून दिल्या आहेत. यात त्यांनी कोणताही भेद बाळगला नाही. आता याच सहकार्याची जाणीव ठेऊन आपण सर्व लोकांनी मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मतदान करायचे आहे. आपल्या एका मताची किंमत काय हे जाणून घ्यायचे असेल तर मागील ७० वर्षे ऊन-पाऊस-वारा सहन करणारा आपला सर्वोच्च मानबिंदू मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आता त्याच्या हक्काच्या घरी विराजमान होणार आहे. मागील ५०० वर्षांचा हा लढा मा. मोदीजींच्या नेतृत्त्वात शांत झाला. आपल्या एका मताने काश्मीर खोरे शांत झाले. मोदीजींच्या नेतृत्त्वात अमितभाई शहा यांच्या अतुल्य भूमिकेमुळे आज काश्मिरचा विकास होतोय. आता असाच आपला विकास करण्यासाठी आपल्याला एकोप्याने कमळ फुलवावे लागेल.” असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
रिफायनरी समर्थक आणि विरोधक, आंबा व्यावसायिक, विविध पक्षांचे आजी-माजी नेते, समाजातील बुद्धिवादी वर्ग, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार यांची या तीन दिवसीय दौऱ्यात भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परिसरातील विकासकामांना न्याय देतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधला. यामुळे स्वाभाविकपणे लोकांना मानसिक समाधान मिळाले आहे यात शंका नाही. “भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सातत्याने मी तुमच्याकडे येत राहीन, तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन” असेही त्यांनी आश्वासन दिले.