नाणीजक्षेत्री लोकसंस्कृती दाखवणारी नेत्रदीपक शोभायात्रा जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांकडून कलांची जपणूक…

Spread the love

नाणीज, दि. 3- श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे जमलेल्या लाखो भाविक व जनतेने आज नेत्रदीपक शोभायात्रा अनुभवली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दडलेल्या संस्कृतीचे, लोककलांचे दर्शन येथे घडले. आपल्या पूर्वंपार चालत आलेल्या या ठेव्यामध्ये लोकांना खिळवून ठेवण्याची किती ताकद आहे, याचाही प्रत्यय आज येथे आला. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, गोवा राज्यातील कला दाखविणारी पथके यात सहभागी होती.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचे नियोजन व मार्गदर्शनामुळे यात नेटकेपणा होता. उत्साह व शिस्त होती. यातून मिळणारा आनंदही द्विगुणीत होता.

या सोहल्याचे निमित्त होते आजचा संतशिरोणी गजानन महाराज यांचा प्रगट दिन व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांची जयंती. हे दोन्हीही आनंदसोहळे दरवर्षी अशी शोभारात्रा काढून व
नेहमीच्या धार्मिक पद्धतीने साजरे होत असतात. मात्र यातील उत्साह व अनुभव दरवर्षी नवा असतो. असाच वेगळा आनंद आजच्या या यात्रेने दिला. तो अनुभवण्यासाठी नाथांचे माहेर ते सुंदरगड या रसत्याच्या दुतर्फा राज्यातून व अण्य राज्यांतून आलेल्या भाविकांची, रसिकांची मोठी गर्दी होती.

नारायणीकडून स्वागत-

शोभायात्रेच्या अग्रभागी संस्थानची हत्तीन ‘नारारणी’ होती. सोंड उंचावून ती सर्वांचे स्वागत करीत होती. प्रारंभीच तिने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण करून टाळ्या मिळवल्या. त्यानंतर पुण्याच्या ढोलपथकाचा दणदणाटात शोभायात्रेत काय असेल याची चुणूक दाखवित होता. त्यानंतर सप्तरंगांचे झेंडे व कलश घेऊन महिला व पुरूषांचा मोठा सहभाग
होता. अतिशय शिस्तबद्ध, दोन रांगा करून ही मंडळी चालली होती. यानंतर विविध देखाव्याना
सुरूवात झाली.

प्रभू श्रीराम चरित्रावर देखावे-

या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर आधारीत विविध प्रसंगाचे देखावे. ते अनेक जिल्हा समित्रांनी सादर केले. यात बालकांड (नागपूर), गुरू शिक्षा (सातारा), सीता स्वयंवर (जळगाव), भरत भेट (बीड), शबरी भेट (धाराशिव), हनुमान भेट (नांदेड), हनुमान जानकी भेट (संभाजीनगर), समुद्र साधना (भंडारा), युद्धकांडातील सेतु बांधणी (नवी मुंबई),राज्याभिषेक सोहळा ठाणे जिल्हा समितीने सादर केला. आयोध्येतील रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून प्रेरणा घेतलेले हे देखावे लक्षवेधी ठरले.

वानर सेना, ढोल व भजन-

शोभयात्रेत मुख्य पिठाची किमान शंभर जणांची वानरसेना आकर्षण होती. अखिल भारतीय युवा सेनेच्या तरुणांनी हनुमान, जटायू, शबरी यांच्या वेशभूषा केल्या होत्या. शोभारात्रेत पुणे,
सोलापूर, मुंबई, बेळगाव (धनगरी) येथील ढोल, ताशा पथकांनी रंगत आणली होती. तर सोलापूर, परभणी, वसई, मुंबई, जालना येथील भजनी मंडळे, लातूरचे माऊली गजर सहभागी होते. त्यांनी वारकरी परंपरेचे वेगळेपण दाखवून दिले.

लोककलांचा गजर-

या शोभायात्रेत अनेक लोककला सादर करण्यात आल्या. त्या त्या भागाची ही ओळख येथे
एकत्रित पाहता आली. यामध्ये पश्‍चिम पालघरचे कोळी नृत्य, रत्नागिरीचे जाकडी नृत्य,
बंगलोरचे चंडी वादक, नाशिकचे पंजाबचा भांगडा नृत्य, वसईचे कोळी नृत्य, गोव्राचे रोटा नृत्य,
दक्षिण बुलढाण्याचे बंजारा नृत्य, उत्तर बुलढाण्याचे आदिवासी समुह नृत्य, नगर जिल्ह्याचे
तेलंगणा राज्यातील धीमसे नृत्य, नंदूरबारचे आदिवासी नृत्य, दक्षिण ठाण्याचे आंध्रप्रदेशचे
भरतनाट्यम, पूर्व पालघरचे तर्फा नृत्य, उत्तर कर्नाटकचे लेझिम पथक, गुजरात राज्याचे गरबा नृत्य, बिदरचे खंडोबा पथक, कोल्हापूरचे सासन काठी, दक्षिण रायगडचा संत देखावा, पुणे जिल्ह्याचे राजस्थान नृत्य, ठाणे ग्रामीणचे काश्मीरचे राज्य नृत्य (दुम्हाल डान्स), धुळे जिल्ह्याचे
पावली व होळी नृत्य, गुलबर्ग्याचे नटराज नृत्य आदींचा सहभाग होता. वेगवेगळ्या भागातील
लोकाकला अतिशय उत्साहात रेथे सादर करण्यात आल्या.

जगद्गुरु श्रींचा रथ-


शोभयात्रेतील सर्वांचे आकर्षण म्हणजे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा रथ. याच रथामध्ये प.पू. कानिफनाथ महाराजही होते. स्वामींजी सर्वांना हात उंचाऊन आर्शीवाद देत होते. तेवढ्याच उत्साहात भाविक त्यांना हात उंचावून दाद देत होते. मध्येच त्यांनी शोभायात्रेचीही पाहणी केली.

संतमहंतांचे रथ-

यामध्ये मध्याभागी देशभरातून आलेल्या विविध आखाड्याच्या संतमहंतांचे रथ होते. हा भव्यदिव्य सोहळा पाहून ते आश्‍चर्यचकीत झाले नसतील तरच नवल! तसेच यामध्ये मराठवाडा पीठाची
पायीदिंडी व त्यात निशाणधारी महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला
सेनेच्या कलशधारी महिला सहभागी होत्या. भजन मंडळे, दिंड्या अशा भरगच्च कार्यक्रमांची येथे रेलचेल होती.

पाण्याची व्यवस्था-

सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवत असल्याने वाटेत जागोजागी पिण्याच्या पाण्याची
व्यवस्था होती. कलावंतांना त्या त्या जागी जाऊन पाणी दिले जात होते. पहाटेपासून या
शोभायात्रेची तयारी सुरू होती. जगद्गुरू श्रींचे आशीर्वाद घेऊन बरोबर नऊला ती सुरू झाली. यावेळी स्वामीजींच्या सर्व कुटुंबाचे औक्षण करण्यात आले.
दुपारी तिचा समारोप झाला. शोभा यात्रेचे सारे नियंत्रण वोकीटॉकीवरून केले जात होते.

महाप्रसाद, आरोग्य शिबिर –

भाविकांसाठी २४ तास महाप्रसाद होता. लोक रांगेने महाप्रसाद घेत होते. कालपासून रेथील श्री काडसिद्धेश्‍वर महाराज रुग्णालयात मोफत सर्वरोग शिबिर सुरू होते. सर्व रोगांचे तज्ज्ञ डॉक्टर्स
त्यात सहभागी होते. त्यांनी तपासणी व उपचार केले. त्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. आज सायंकाळी त्याची सांगता झाली. सुंदरगड व नाथांचे माहेर रेथील सर्व मंदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती.
एकूण वारी उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी होती. रात्रभर व सकाळी दहा पर्यंत भाविक सुंदरगडावर येत होते. भाविकांची सर्व वाहने रस्त्याकडेला शिस्तित लावण्यात आली होती.

सत्कार सोहळा-

दुपारनंतर रुग्णवाहिका सेवेसाठी रोगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नुकत्याच झालेल्या महारक्तदान सोहळ्यात वेगळे काम करणाऱ्या व्रक्ती व उपपीठांचा सत्कार करण्यातआला. त्याचे प्रमुख पाहुणे पालकमंत्री उदय सामंत होते. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष केंद्रेसाहेब यावेळी उपस्थित होते.
रात्री प.पू. कानिफनाथ महाराज व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची प्रवचने होऊन
दोन दिवसीय सोहळ्याची सांगता झाली.

फोटो ओळी-

1) नाणीजक्षेत्री रविवारी काढण्यात आलेली शोभारात्रा…

२) नाणीज क्षेत्री रविवारी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे स्वागत करताना नारायणी हत्ती…

३) जगद्गुरू श्रींच्या कुटुंबाचे औक्षण करताना सुवासिनी….

४) शोभयात्रेतील भाविकांना आशीर्वाद देताना जगद्गुरू नरेन्द्राचार्यजी महाराज…

५) शोभा यात्रेतील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा रथ….

६) शोभायात्रेत सादर झालेल्या लोककला….

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page