कोकणातील साहित्यिक वाटचाल याच्यावर विशेष लेख…२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन…

Spread the love

नवी दिल्ली- २१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील साहित्यिक वाटचाल यावर विशेष लेख..
     

महाराष्ट्राच्या इतर विभागाप्रमाणेच एक विभाग म्हणजे कोकण. या कोकणात वेधक निसर्गसौंदर्य, भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण लाभलेला समुद्रकिनारा, विविध झाडे – झुडुपे, डोंगर – दऱ्या अशा अनेक नयनरम्य नैसर्गिक साधनसंपत्ती आढळतात. त्यामुळे इतर विभागाप्रमाणेच कोकणचे वेगळे महत्व आहे. त्यासोबतच कोकण हा महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्नता लाभलेला प्रदेश आहे. त्याचे कारण म्हणजे याच कोकणात अनेक चळवळींचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे त्या त्या चळवळींचा मोठा प्रभाव हा कोकणासह महाराष्ट्रात झाला. त्यामुळे कोकणातल्या सर्वच क्षेत्राची वाटचाल अत्यंत लक्षणीय आहे. एवढंच नाही नव्हे तर, इतर चळवळीप्रमाणेच इथल्या साहित्यिक चळवळीचा इतिहास मोठा आहे आणि त्याला विविध साहित्यप्रकारांची आणि प्रसिद्ध साहित्यिकांची पार्श्वभूमी आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही कालही प्रभावी होती, आजही लक्षणीय आहे आणि भविष्यातदेखील तिचे योगदान मोठे असणार आहे.
        

कोकणात नमन, जाखडी, लोककथा, ओव्या आणि भारुडे मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती आणि कालानुरूप आजही त्यांचे अस्तित्व भक्कम आहे. दशावतारी नाट्यप्रकारही इथल्या लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या साहित्याच्या माध्यमातून कोकणातील अनेक प्रथा – परंपरा – सण – उत्सव यांचे महत्व अधोरेखित झाले. आजही ग्रामीण भागात वरील प्रकारातुन साहित्य निर्मिती आणि सामाजिक परिवर्तन होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येते. मुख्यतः लोककथा, ओवी, भारुडे, कविता, कथा, कादंबरी आणि नाटकांमधून व्यक्त झाली आहे. म्हणूनच कोकण हा केवळ निसर्गरम्य प्रदेश नसून, तो मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत महत्त्वाचे योगदान देणारा भाग आहे. कोकणातील साहित्यिक वाटचाल लोकपरंपरेपासून आधुनिक साहित्यापर्यंत विविध टप्प्यांतून गेली आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही पारंपरिक आणि आधुनिक विचारांचे मिश्रण आहे. लोकसाहित्य, कविता, कथा आणि नाट्य या सर्व माध्यमांतून कोकणाने मराठी साहित्य समृद्ध केले आहे.
    

कोकणातून अनेक नामवंत साहित्यिक उदयास आले, ज्यांनी मराठी साहित्याला मोठे योगदान दिले. कृ. आ. केळुस्कर यांनी गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले चरित्र आपल्या स्वखर्चातून लिहिले आणि त्यातून साहित्य चळवळ प्रवाहित केली. कवी केशवसुत यांना मराठी आधुनिक मराठी कवितेचे मानले जाते. त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि अनिष्ट प्रथा यावर कवी केशवसुत यांनी प्रहार करताना मानवतेचा आणि सामाजिक जाणिवा वृंद्धीगत करणारा आशय मांडला. त्यापुढील धनंजय कीर यांच्यासारख्या चरित्र लेखकांनी भारतातील अनेक नामवंत आणि महनीय व्यक्तिमत्वाची चरित्रे निर्माण केली. साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, भारतरत्न डॉ. पा. वा. काणे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कथाकार जी. ए. कुलकर्णी, महेश एलकुंचवार यांसारखे कादंबरीकार, लेखक आणि नाटककारही कोकणातील आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने साहित्य चळवळ समृद्ध झाली. जयवंत दळवी आणि इतरांनी नाट्यलेखन आणि विविध क्षेत्रात लेखन करताना त्या – त्या लेखनाचा आशय समाजमनाला भावणारा ठेवला. त्यामुळे संवेदनशील असणारे कोकणी समाजमन या लेखनाकडे आकर्षित झाले. परिणामी कोकणात साहित्यिक चळवळ ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.
       

अशा असंख्य लेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, वंचित आणि सर्वसमावेशक कोकणी मनाला भुरळ घातली. प्रत्येकाच्या लेखणीच्या आशयसंपन्न लेखनामुळे लहान ते ज्येष्ठ यांच्यापर्यंत साहित्याची आवड निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणजे कोकणात अनेक साहित्य संमेलन यशस्वी झाले. रत्नागिरी येथे १९९० मध्ये झालेले साहित्य संमेलनानंतर तत्कालीन संमेलनाध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत कोकणातील वाडी – वस्त्यांमधील संवेदना जपणाऱ्या मनांनी लिहायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे अनेक कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखन करणारे साहित्यिक तयार झाले. त्यातून त्यांच्याच पुढाकाराने कोकणात विविध साहित्य संमेलने भरवली जात आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कोकणात झाली. त्यासोबतच कोकण मराठी साहित्य परिषदेचे १७ पेक्षा जास्त केंद्रीय संमेलने, साहित्य विश्वात पहिल्यांदाच सहा राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन, राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन यासह स्थानिक स्तरावर अनेक संमेलने झाली. त्यात राजापूर येथे ग्रामीण साहित्य संमेलनाचे, नाट्य संमेलनाचे दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. त्यात कोकणी भाषा आणि साहित्य चळवळ यावर मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणली जाते. महिला साहित्य संमेलन असो वा युवा साहित्य संमेलनातून महिला आणि युवा वर्गाच्या समोर असणाऱ्या प्रश्नांना आवाज असतो. त्यामुळे या साहित्य संमेलनात उपस्थितीदेखील मोठी असते.
     

काळाच्या ओघात कोकणातील असंख्य नवलेखक आपल्या सृजनशील लेखणीच्या द्वारे आता कादंबरी, कविता, लघुकथा, चित्रवाहिन्यावरील मालिकांचे लेखन, संहिता लेखन आणि चित्रपट कथा या माध्यमांतून योगदान देत आहेत. कोकणावर आधारित पर्यटन, विज्ञान, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कथा लोकप्रिय होत आहेत. जुन्या आणि नवीन लेखकांनी कोकणच्या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले आहे.
 

काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मागील किती तरी वर्षांपासून सुरू असलेली साहित्यिक आणि मराठी भाषिकांची मागणी विद्यमान सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे पूर्ण झाली. त्यामुळे आता सर्वच मराठी भाषिकांनी मराठी भाषेचे अभिजातपण जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांना हातभार लावण्यात कोकणचे मोठे योगदान असेल. यावर्षी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
    

थोडक्यात अनेक थोर लेखकांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्या भूमीत ज्या अपेक्षेने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ उभारली त्याच जोमाने ती पुढे – पुढे जात आहे. अनेक संस्था यासाठी पुढाकार घेऊन भडकत्या प्रसारमाध्यमांच्या काळात तरुण मनाला लिहिते करत आहेत. त्यामुळे कोकणातील साहित्यिक वाटचाल ही आव्हानात्मक जरी असली तरी समाधानकारक आहे.
*©® श्री. माधव विश्वनाथ अंकलगे*
*वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी*
*संपर्क – ९०२१७८५८७४ / ९७६४८८६३३०.*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page