
आयुर्वेदानुसार आचरण करून शंभर वर्षे जगा – आयुर्वेदाचार्य वैद्य सुविनय दामले.
चिपळूण: आपल्या आयुर्वेदात षडरस आहार सांगितला आहे, तर पाश्चात्य चौरस आहार सांगतात. आपण आपला प्रदेश आणि परिसरातील फळे खावीत. सफरचंदापेक्षाही डाळिंब आणि आवळा ही फळे अधिक उपयुक्त आहेत. वजन न्यून करण्यापेक्षा जाडी अल्प करावी. आपल्याला आवडते, आपल्याला पचेल असे आणि आपल्या प्रदेशात जे पिकते ते खावे. आयुर्वेदानुसार आचरण करून १०० वर्षे जगा असा संदेश ३२ वर्ष शुद्ध भारतीय आयुर्वेदाची चिकित्सा करणारे कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील वैद्य सुविनय दामले यांनी दिला. सविनय दामले हे रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे सदस्य आहेत.
तालुक्यातील माधव सभागृहात २८ डिसेंबर या दिवशी ५० वे वर्ष साजरे करणाऱ्या ‘रोटरी क्लब चिपळूण’ च्या वतीने आयोजित केलेल्या ‘याला म्हणतात आयुर्वेद’ या विषयावर ते बोलत होते. रोटरी क्लबने हा सामाजिक, आरोग्यदायी आणि स्तुत्य उपक्रम आयोजित केल्या विषयी सर्वांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
वैद्य सुविनय दामले यांनी सांगितलेली सूत्रे
१. आपले दिनचर्या पाळावी. एखादा दिवस उपवास करावा अथवा एकच पदार्थ दिवसभर खावा.
२. ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण आणि आज्ञा पालन करावे, ही आपली भारतीय संस्कृती आहे.
३. जीवनशैली, वेशभूषा अन संस्कार भारतीय संस्कृती प्रमाणे हवेत.
४. जेवणातला आणि जीवनातला स्नेह संपला की रुक्षपणा येतो.
५. सध्या मनुष्यातील विस्मरण वाढले आहे, याचे कारण स्निग्धता अल्प होण्यात आहे. आयुर्वेदामध्ये आपल्याकडे तेल लावण्याचे २४ प्रकार आहेत. प्रतिदिन किमान ७ चमचे तेल अंगाला लावले पाहिजे.
६. शरीराचा प्रत्येक अवयव व्यक्ती जे बोलते ते ऐकत असतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक बोलले पाहिजे. शरीराच्या प्रत्येक अवयव प्रतिदिन कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
७. आजार होणारच नाही, असे आपले शरीर बळकट करायला हवे. आहाराची पथ्य पाळणे, हे लसीकरणच आहे. आपल्या विविध उत्सवात देवतांचा मिळणारा प्रसाद (सुंठवडा) हा ‘बुस्टर डोस’ च आहे.
८. आत्म्याच्या शुद्धीसाठी अध्यात्म शिकणे आवश्यक आहे. जीवन जगण्यासाठी जेवण, प्राणायाम प्राणायाम नामस आणि नामस्मरण या तीन गोष्टी आवश्यक आहेत.
९. अनेक व्यक्ती १० टक्के शारीरिक, ३०% मानसिक आणि ६० टक्के अध्यात्मिक व्याधींशी संबंधित असतात.
१०. ईश्वर रोगमुक्त करणार आहे, असा हा भाव हवा. औषध घेताना नामस्मरण करावे.
या कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालन वैद्य निनाद साडविलकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन मंगेश गोंधळेकर, चिटणीस राजेश ओतारी, प्रसाद सागवेकर, रोहन देवकर, रमण डांगे, शैलेश सावंत, समीर जानवळकर, सुनील वाडेकर, राजीव गांधी इत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम शेवटी रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर यांनी आभार प्रकट करून वर्षाची सुरुवात आरोग्यदायी आणि सुदृढ शरीराने करावी अशी विनंती देखील केली. वैद्य सुविनय दामले प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी लोटे येथे आयुर्वेदिक महाविद्यालय मध्ये भेट देणार आहेत तरी सर्व नागरिकांना विनम्र आवाहन की आपण त्यांची भेट जरूर घ्यावी.