मुंबई :- नांदेडमध्ये २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली . धक्कादायक बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा असं देखील म्हटलं आहे.
“आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांची कामगिरी निराशाजनक नाही तर चिंताजनक आहे. आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे यांनी तात्काळ तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यायला हवा” अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. यासोबतच आम्ही मृतांच्या नातेवाईकांना ५ -१० लाख मदत दिली, असं म्हणून गेलेले जीव परत येत नाहीत असं देखील म्हटलं आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
“महाराष्ट्राचं आरोग्य खातं अशा आरोग्यमंत्र्यांच्या हातात दिलं तर ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा असेल हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं. आम्ही मृतांच्या नातेवाईकांना ५ – १० लाख मदत दिली, असं म्हणून गेलेले जीव परत येत नाहीत. कृपया या घटनेचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी ओळखावं” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.