जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | ऑक्टोबर १५, २०२३.
“माणूस संवेदनशील प्राणी समजला जातो. राष्ट्र, धर्म, संस्कृती, परंपरा, अस्मिता आदी संवेदना त्याला सामाजिक प्रेरणा देतात. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याकडे जोपर्यंत ‘भाजपा नेते’ या चष्म्यातून पहाल तोपर्यंत सामाजिक प्रेरणा देणाऱ्या या संवेदना जागृत होणार नाहीत. ज्यावेळी हा चष्मा उतरवून ‘देशाचे नेते’ या चष्म्याला डोळ्यांसमोर आणाल त्याचवेळी ‘नरेंद्र मोदी’ आणि समकालीन नेते यांच्यातील फरक समजू शकेल.” भाजपा नेते प्रमोद अधटराव यांनी शिवसेना (ठाकरे गट) च्या ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रमाबाबत बोलताना पुढे सांगितले की, “पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईच्या जोरावर तग धरून आहेत.खासदार संजय राऊत, वरूण सरदेसाई यांच्यासारखे लोक शिवसेनेच्या वाताहतीला जबाबदार आहेत. तर कोकणात शिल्लक राहिलेले आमदार भास्कर जाधव साहेब आणि संगमेश्वरमधील स्वयंघोषित निष्ठावंत नेते उरल्यासुरल्या शिवसैनिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता दिवस बदलले आहेत; आत्मपरीक्षण करण्यासाठी वेळ आहे तेव्हा करून घ्या. जमीन निसटत चालली आहे.” असे म्हणत शिवसेनेच्या सध्याच्या कार्यप्रणालीवर हल्ला चढवला.
“मा. मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या कामांची यादी कधीतरी चाळून पहा. कोरोना काळात परदेशस्थ भारतीयांना पुन्हा भारतात आणण्यासाठी ‘वंदे भारत’ मोहिमेपासून ते अगदी युद्धजन्य परिस्थितीत सुखरूप भारतात परत आणण्यासाठी आखलेल्या अन्य मोहिमा आणि त्यांना युद्धखोर राष्ट्रांनी दिलेला प्रतिसाद याबाबत माहिती मिळाली की मोदीजींची आंतरराष्ट्रीय नीती किती कणखर होती ते कळून येईल. मोदीजींनी रेल्वेला स्वयंपूर्ण केले. आरोग्य आणि अंतराळ क्षेत्रात देशाला सर्वश्रेष्ठ बनवले. भारताच्या सीमा मजबूत केल्या. राफेलसारख्या अद्ययावत विमानांची खरेदी करून संरक्षण व्यवस्था कणखर केली. पाकिस्तान, चीन यांसारख्या कुरापती शेजाऱ्यांना धाक बसवला. काश्मीर मधून कलम ३७० कलम हटवले, हिंदूंच्या अस्मितेचे प्रतिक प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे निर्माणकार्य त्यांच्याच कारकिर्दीत सुरु झाले आणि आता त्याचे लोकार्पण देखील होणार आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरण त्यांच्याच कारकिर्दीत सुरु आहे.” असे म्हणत मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा श्री. अधटराव यांनी पाढा वाचला.
“आता तुमच्या विकासाची व्याख्या पाखाडी, शाळा, नळपाणी यांच्यापुढे गेलीच नाही त्याला मोदीजींचा काय दोष? मोदीजींनी जनधन खात्यांच्या माध्यमातून नागरिकांना बॅंकेशी जोडले. त्यांचा लाभ थेट त्यांच्या खात्यात दिला. मोदीजींनी ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य दिले. सिलेंडर सर्वसामान्य माता-भगिनींच्या घरी पोचवला. नुकतेच महिलांना ३३% राजकीय आरक्षण दिले. तीन तलाकवर कायद्याने बंदी आणली. शिक्षण, स्वच्छता, उद्योग आदी क्षेत्रांमध्ये भरीव कार्य याच सरकारच्या काळात झाले. श्रमयोगींचा सन्मान, सैनिकांचा सन्मान, खेळाडूंचा सन्मान, महिलांचा सन्मान आदी गोष्टींबाबत जिज्ञासा असेल तर आधीच्या सरकारांनी केलेल्या कामाची तुलना एकदा करून बघाच. जी-२० शिखर संमेलनाचे यशस्वी आयोजन, सामाजिक श्रेणींना योग्य न्याय देण्यासाठी कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील समकालीन नेते बरेच मागे पडलेले पहायला मिळतील.” असेही ते म्हणाले.
“सांगायचे झाल्यास दिवस पुरणार नाहीत इतकी कामे मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केली. आता जरा तुमचा हिशोब करा. कोकणच्या विकासासाठी तुम्ही सर्वांनी मिळून केलेली फक्त १० कामे तरी आठवा. नाही आठवणार! अहो, केलीच नाहीत तर आठवणार कशी? फक्त आपले हिस्से मिळवण्यासाठी कोकणात येणारे उद्योग बंद पाडण्याचे उद्योग इमानेइतबारे करणारे तुम्ही ‘आता होऊ द्या चर्चा’ म्हणता… अहो जनाची सोडा, मनाची जरी असेल तरी यापुढे शांत रहाल. नाहीतर अत्यंत गांभीर्याने आव्हान देतो… समोरासमोर बसून लोकांसमोर एकदा चर्चा होऊनच जाऊ द्या. म्हणजे लोकांनाही कळेल शिल्लक राहिलेल्यांमध्ये किती आग बाकी आहे. नुसती मशाल पेटत नाही. त्यासाठी आगपेटीची आवश्यकता असते. पण आता तुमच्याकडे आगपेटीच काय साधी गारगोटीही शिल्लक नाही. त्यामुळे सवंग प्रसिद्धीसाठी चालू असलेली ही थेरं एकतर थांबवा नाहीतर एकदा समोरासमोर होऊनच जाउद्या चर्चा.” अशा परखड भाषेत श्री. अधटराव यांनी शिवसेना (ठाकरे गट) च्या नेत्यांचा समाचार घेतला.