मुंबई :- शिवसेना वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे का? शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आला नाही. हिटलरशाही, हुकुमशाही अशी उद्धव ठाकरेंची कामाची पद्धत होती. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढणारी शिवसेना स्थापन झाली, पण त्याच मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केले असा घणाघात शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर कुणी खोके घेतले हे सिद्ध करावे. जर ते सिद्ध झाले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन अन्यथा त्यांनी आमच्या घरी भांडी घासावी. मुख्यमंत्रिपद गेले, आमदार गेले म्हणून त्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान बाप-बेट्याचे आहे. त्यामुळे १ वर्षापासून गद्दार-खोके असं सुरू आहे त्याला आता लोकंही कंटाळली आहेत, तुमच्यात हिंमत असेल तर आरोप सिद्ध करून दाखवा असं जाहीर आव्हान आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच उद्याचा दिवस आम्ही स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करणार आहोत. उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. गद्दारांना आम्ही गाडल्याचा दिवस उद्या साजरा करू. पाल मेल्यावर शेपटी वळवळते अशी उद्धव ठाकरेंची अवस्था आहे. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत हे काही दिवसांत त्यांच्या लक्षात येईल. लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.
दरम्यान, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीशी संघर्ष करून शिवसेना मोठी केली. त्यांच्याच विचारांची गद्दारी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी केली. याचे प्रायश्चित उद्धव ठाकरेंना भोगावे लागेल असंही रामदास कदम म्हणाले. त्याचसोबत भगव्या झेंड्याला अधिक शान कशी येईल, शिवसेनाप्रमुखांची खरी शिवसेना कोणती हे तळागळातील प्रत्येक व्यक्तींना दाखवून देऊ असं कदम यांनी म्हटलं आहे .