भारतीय संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघानं अष्टपैलू कामगिरी केली. भारताकडून स्मृती मंधानानं सर्वाधिक 90 धावांची खेळी केली.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 गडी राखून शानदार विजय नोंदवलाय. स्मृती मंधानाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताला दिलेलं 216 धावांचं लक्ष्य 40.4 षटकांत 4 गडी गमावून सहज गाठलं. या विजयासह भारतानं तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी :
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. आफ्रिकेला 50 षटकात 8 विकेटच्या मोबदल्यात फक्त 115 धावांपर्यंतच मजल मारता आली. आफ्रिकेकडून पहिल्या विकेटची 102 धावांची भागिदारी झाली, पण त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केलं. आफ्रिकेकडून कर्णधार लॉरानं 57 चेंडूंत 7 चौकारांसह 61 धावा केल्या. ताजमीननं लॉरासोबत शतकी भागीदारी केली. ताजमीननं 38 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघानं 40.4 षटकात 4 गडी गमावून 220 धावा सहज पूर्ण केल्या. भारताकडून स्मृती मंधानानं सर्वाधिक 90 धावांची खेळी खेळली. शेफाली वर्मा 25 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरनं फलंदाजीत 42 धावांचं योगदान दिलं. भारतानं 40.4 षटकात 4 गडी गमावून 220 धावा करत सामना सहज जिंकला आणि मालिका खिशात घातली.
स्मृती मंधानानं झळकावलं अर्धशतक –
भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मंधानाला या मालिकेत तिसरं शतक झळकावण्याची संधी होती. पण ती थोडक्यात हुकली. मंधानानं 83 चेंडूत 90 धावांची खेळी केली. या खेळीत तिनं 11 चौकार मारले आणि आपल्या संघाला सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
स्मृती मंधानानं रचला इतिहास-
पहिल्या दोन सामन्यांमध्ये शतकं झळकावणारी मंधाना महिला क्रिकेटच्या इतिहासातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. मंधानानं पहिल्या एकदिवसीय सामन्यात 117 धावांची आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 136 धावांची शानदार शतकी खेळी खेळली होती. या उत्कृष्ट कामगिरीसाठी मंधानाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारताचा दक्षिण आफ्रिकेला धोबीपछाड-
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6 गडी राखून शानदार विजय मिळवत भारतानं दक्षिण आफ्रिकेचा मालिकेत धुव्वा उडवला. भारतानं मायदेशातील एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली. भारतानं पहिला वनडे 143 धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 4 धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला होता.