
रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगड सज्ज झाला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असून प्रेरणा आणि ऊर्जेचा स्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमींनी आज (6 जून) सकाळपासूनच रायगडावर मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने रायगडावरही तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने शिवभक्तांसाठी रायगड सोयी-सुविधांची सज्जता केली आहे. याशिवाय अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा यासाठी दरवर्षी किल्ले रायगडावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही रायगडावर 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. यासाठी यंदा ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवकालीन युद्ध कला असलेले चित्तथरारक मर्दानी खेळ आणि शाहीर दिलीप सावंत यांच्यासह तब्बल राज्यभरातील 1600 शाहिरांचा शाहिरी नजराना यावेळी सादर करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बिंदू असणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त लाखो शिवप्रेमी रायगडावर दाखल होतात. त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, तसेच सध्याच्या उष्णेतचा विचार करता जिल्हा प्रशासनाने रायगडावर मुबलक पाण्याची व्यवस्था, निवासाची व्यवस्था आणि स्वच्छतागृहे ठिकठिकाणी उभे केले आहेत. याशिवाय शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रक्षेपण सर्व वाहिन्या आणि व सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच रायगड परिसरात एलपीडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या सोहळ्यासाठी 2 हजार पोलीस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत, तर 700 शासकीय कर्मचारी आणि 120 स्वयंसेवक या ठिकाणी काम करणार आहेत.
कोल्हापुरात नवीन राजवाड्यामध्ये राज्याभिषेक सोहळा…
दरम्यान, यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच कोल्हापुरातील नवीन राजवाड्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. आज सकाळी साडेसात ते दहा या वेळेत नवीन राजवाडाच्या प्रांगणात राज्याभिषेक सोहळा रंगणार असून सनई चौघडा, झांज याच्या सोबतीत सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येईल. यानंतर पोवाडा, शौर्य गीत, मराठी स्फूर्ती गीत आणि मर्दानी खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे.