मुंबई : आज शिवसेनेचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त सामनाचा विशेष अग्रलेख प्रसिद्ध झालाय. यात शिवसेनेचा इतिहास, बाळासाहेबांचा विचार सांगण्यात आलाय. तसंच शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. “महाराष्ट्रात गेली 57 वर्षे वाघाचीच डरकाळी घुमत आली आहे आणि घुमत राहणार आहे. महाराष्ट्रातील मिंध्या कोल्ह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
शिवसेना ही मर्द मावळय़ांची भगवद्गीता आहे. आज मा. बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत. पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे. खरी शिवसेना तीच, जिच्या पोटात एक ओठात दुसरे नाही. इथे सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत. शिवसेना 57 वर्षांची झाली व तिची घोडदौड यापुढेही सुरूच राहील ती याच प्रामाणिकपणामुळे. मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या!, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.
शिवसेना ५७ वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी ‘सामना’ शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल, असं म्हणत सामनातून शिवसेनेच्या इतिहासाची उजळणी करण्यात आली आहे.
आता म्हणे ‘आम्हीच शिवसेनेचे निर्माते!’ हा असा आव आणणाऱयांच्या कमरेवरची वस्त्रं दिल्ली दरबारी उभे राहताच भीतीने भिजतात. यांचे नेते मोदी आणि शहा, जे महाराष्ट्राच्या अस्मितेचा पायाच उखडून टाकायला निघाले आहेत. तर हे प्रतिवालेही त्यांच्या प्रतिशिवसेनेचा म्हणे वर्धापन दिन साजरा करीत आहेत. अशा ‘प्रति’ मंडळांच्या मनगटात ना ताकद ना छातीत स्वाभिमानाचा हुंकार आणि जिद्द. सर्व खेळ पैशांचा. दिल्लीच्या चरणी थैल्या वाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणारे शिवसेनेचे नाव घेतात तेव्हा शिवसेनेसाठी रक्त सांडणारे असंख्य आत्मे चिडून तडफडत असतील, असं म्हणत सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करण्यात आला आहे.
मिंधे गटाची ही राजकीय मजबुरी आहे. त्या मजबुरीतूनच खऱया वाघाची नक्कल करण्याची, स्वतःला विचारांचे वारसदार वगैरे म्हणवून घेण्याची नौटंकी सुरू आहे. पण शेवटी नकली ते नकली आणि असली ते असली! गद्दार ते गद्दार आणि खुद्दार ते खुद्दारच! महाराष्ट्रातील जनता खुद्दार कोण आणि महाराष्ट्रधर्माच्या पाठीत खंजीर खुपसणारे गद्दार कोण हे ओळखते, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचा खरा वाघ आणि महाराष्ट्राशी बेइमानी करणारे ‘मिंधे’ वाघ यातील फरक जनता ओळखून आहे. डरकाळी पह्डतो तो वाघ असतो आणि ओरडतो तो लांडगा. महाराष्ट्रात सध्या डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे. असे अनेक कोल्हे-लांडगे मागील ५७ वर्षांत महाराष्ट्राच्या वाघाने शिकार करून फस्त केले आहेत. महाराष्ट्रात गेली 57 वर्षे वाघाचीच डरकाळी घुमत आली आहे, असं म्हणत सामनातून इशारा देण्यात आलाय.