शिवसेना ठाकरे गटाचे नेते व गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव हे संंगमेश्वर तालुक्यात वारंवार दौरे करत असल्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.
हि उमेदवारी पक्की झाल्यानेच बुधवारी आमदार भास्कर जाधव यांनी माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांची त्यांच्या पाटगाव येथील रविराज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. तर माजी आमदार सुभाष बने हे सध्या मुंबईत असल्यामुळे त्यांचीही ते लवकरच भेट घेणार आहेत.
ठाकरे गटाचे नेते श्री भास्कर जाधव हे गुहागरचे आमदार आहेत. मात्र त्यांचे संंगमेश्वर तालुक्यात सध्या दौरे वाढल्याने ते अगामी विधानसभेची निवडणुक चिपळूण-संगमेश्वरमधून लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. तर त्यांना चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढवण्यासाठी मातोश्री कडून हिरवा कंदील मिळाला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेच त्यांच्या तालुक्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. असे बोलले जात आहे.
आमदार भास्कर जाधव हे ठाकरे गटाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जातात. त्यांचे संंगमेश्वर तालुक्यात दौरे वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवरूख मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ठाकरे गटाच्या दहिहंडीला त्यांनी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
यानंतर गणेशोत्सवात त्यांनी तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले होते. आता पुन्हा त्यांच्या तालुक्यात गाठीभेटी वाढल्याने त्यांची चिपळूण -संगमेश्वर विधानसभेची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे.बुधवारी त्यांनी माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. तसेच त्यांच्याशी सविस्तर चर्चाही केली.
यावेळी त्यांच्या समवेत ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, संतोष लाड, मुन्ना थरवळ, विश्वास फडके, बाबा दामुष्टे, साडवलीचे सरपंच राजेश जाधव, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष बाबा साळवी, शेखर खामकर आदी उपस्थित होते. दरम्यान माजी आमदार सुभाष बने हे सध्या मुंबईत असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. लवकरच आमदार भास्कर जाधव हे त्यांची भेट घेणार आहेत.