पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार इथल्या सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. आरक्षणावरुन काँग्रेस पक्ष नागरिकांची दिशाभूल करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नकली शिवसेना म्हणात उद्धव ठाकरेंना डिवचलं.
नंदुरबार- नंदुरबार इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा सुरू आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना उबाठा गटासह काँग्रेसवर हल्लाबोल केला. नकली शिवसेना केवळ मतांसाठी बॉम्बस्फोटातील आरोपीला खांद्यावर घेऊन नाचते, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेसनं आरक्षण हटवण्याची अफवा पसरवली आहे. मात्र काँग्रेसनं कर्नाटकमध्ये रातोरात मुस्लिमांना आरक्षण दिलं, तोच अजेंडा ते इतर राज्यात लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातींचं आरक्षण काढून ते मुस्लिमांना देणार आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
🔹️आमची मातृभूमी स्वार्गापेक्षाही सुंदर आहे…
काँग्रेस पक्ष हा अंहकारानं भरलेला पक्ष आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत असल्यानंतर गरीबाला त्रासून सोडते. मात्र आज एका गरीबाचा मुलगा पंतप्रधान होऊन जनतेची सेवा करत आहे, तर त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत. मी इथल्या पुढील पिढींसाठी काम करत आहे. मी निवडणुकीसाठी काम करत नाही. आदिवासी नागरिकांना होणाऱ्या सिकलसेल आजारांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. अद्यापही ज्या आदिवासी नागरिकांना घर मिळालं नाही, त्यांच्यासाठी घरं देण्यात येतील, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.
🔹️नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा करते…
“नकली शिवसेना मला गाडण्याची भाषा करत आहे. मात्र दुसरीकडं तुष्टीकरण करण्याचं काम करत आहेत. बाळासाहेबांना हे पाहुन दुख होत असेल. महाराष्ट्रात मुंबई स्फोटातील आरोपीला खांद्यावर घेऊन प्रचार करत आहेत. बिहारमध्ये चारा घोटाळ्यातील आरोपीला खाद्यांवर घेऊन नाचत आहेत. तर महाराष्ट्रातील नकली शिवसेना बॉम्बस्फोटातील आरोपीला खांद्यावर घेऊन प्रचार करत आहेत. मला गाडण्याची भाषा करत आहेत. केवळ मताच्या राजकारणासाठी त्यांची ही उठाठेव सुरू आहे,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत केला.