जनशक्तीचा दबाव न्यूज | चिपळूण | फेब्रुवारी १, २०२३.
येथील डीबीजे महाविद्यालयाच्या अकौंटन्सी विभागाकडून शेअर मार्केट प्रात्यक्षिक स्पर्धा घेण्यात आली. वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यापैकी शेअर मार्केट हा पर्याय गेल्या दोन-तीन वर्षात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे या शिक्षणाची आवश्यकता ओळखून विद्यार्थ्यांसाठी बँकिंग, विमा, अकौंटिंग, व्यवस्थापन व शेअर बाजार याविषयी पाच फेऱ्यांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
अंतिम फेरीत पाच संघांचा समावेश करण्यात आला. अंतिम फेरीत स्पर्धकांना विविध कंपन्यांची शेअर खरेदी व विक्री करून जास्तीत जास्त गुण प्राप्त करायचे होते. यासाठी स्पर्धकांना आभासी स्वरूपात रु. ५० लाख रक्कम देण्यात आली होती. या स्पर्धेत द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गातील मिहीर संसारे, वेदांत वरवडेकर आणि ओम लाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचा हेतू विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविणे हा होता. सर्व स्पर्धकांनी शेअर खरेदी विक्रीची प्रक्रिया खेळाच्या माध्यमातून शिकण्याचा अनुभव घेतला. या स्पर्धेचे परिक्षण सौ.शिल्पा भिडे यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी, अकाऊंटन्सी विभागप्रमुख चेतन खांडेकर यांनी मेहनत घेतली.
सर्व विजेत्यांचे आणि आयोजन समितीचे अध्यक्ष मंगेश तांबे , डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट व उपप्राचार्य डॉ. चांदा यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सफा देसाई हिने केले. तर रसिका फणसे हिने आभार मानले.