एबी फॉर्म नसताना शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून भरला उमेदवारी अर्ज…

Spread the love

नाशिक लोकसभा मतदार संघाचा महायुतीचा तिढा कायम असतानाच अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज यांनी आज पक्षाचा एबी फॉर्म नसताना उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून अर्ज भरल्याचं सांगितलं. त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला.

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून दोन दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराज यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अशात आज पुन्हा शांतीगिरी महाराज यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं सांगितलं. एकीकडे महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसताना शांतिगिरी महाराज यांनी दुसऱ्यांदा भरलेल्या निवडणूक अर्जामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल…

यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक चांगलीच परीक्षा बघणारी ठरत आहे. महायुतीत उमेदवार कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहेत. रोज नवनवीन नावे समोर येत आहेत. अशात आज उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीबाबत मोठा ट्विस्ट बघायला मिळाला स्वामी शांतीगिरी महाराज यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र हा अर्ज भरताना त्यांनी शिवसेना नावाने भरल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत महायुतीतर्फे आणि शिंदे गटातर्फे नाशिक लोकसभेसाठी कुठलाही अधिकृत उमेदवार अजूनही घोषित करण्यात आलेला नसताना स्वामी शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय तज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वेसर्वा 1008 स्वामी श्री शांतीगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी टाकण्यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली होती.

राज ठाकरेंचीही घेतली भेट…

शांतीगिरी महाराजांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही कारणामुळे ही भेट होऊ शकली नाही. यादरम्यान महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती; मात्र महायुतीतील रस्सीखेच आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. हे बघता महाराजांनी काही दिवसांपूर्वीच प्रचाराला सुरुवात केली. महाराजांनी काही दिवसांपूर्वीच अपक्ष अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली. यादरम्यान शिंदे गटाचे अजय बोरस्ते यांनी त्यांची भेट घेत चर्चा देखील केली होती. चर्चा काय झाली याची माहिती मिळू शकली नाही. मात्र आज आपल्या भक्त परिवारांसोबत मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोण आहेत शांतीगिरी महाराज?…

शांतीगिरी महाराजांना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे. त्यामुळे निवडणुकीत बाजी मारू शकतात असं महाराजांच्या भक्त परिवाराला वाटतं. 2009 लोकसभा निवडणूक रिंगणात शांतीगिरी महाराज उतरले होते. त्यावेळी ते कोणत्याही राजकीय पक्षातून निवडणूक लढवत नव्हते. असं असताना त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. यामुळे तत्कालीन खासदारांचं टेन्शन वाढलं होतं. पण या निवडणुकीनंतर त्यांनी राजकारणात फारसा रस दाखवला नाही. त्यात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराजांचा फोटो व्हायरल झाला होता. यावेळी लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी महाराजांना केल्याची चर्चा होती. त्यामुळे ते या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून लढतील अशी शक्यता होती. मात्र अद्याप नाशिकमध्ये महायुतीचा तिढा सुटलेला नसल्याने ही जागा कुठल्या पक्षाला सुटते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page