
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांकडून राजकारण सुरुय.
मुंबई/ प्रतिनिधी- ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय. नारायण राणेंना अटक झाली तेव्हा अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन आला होता असा दावा राऊतांनी केला. तर आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचं नारायण राणेंनी सांगितलं होतं. दरम्यान राणेंचा हा दावा देखील राऊतांनी फेटाळला आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या आहेत. दिशा मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका म्हणून उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता. दरम्यान नारायण राणेंचा हा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी फेटाळून लावलाय.
फोनवरुन ठाकरेंची शिवसेना आणि राणे कुटुंबात दावे-प्रतिदावे सुरु आहेत. दरम्यान यानंतर राऊतांनी देखील एक मोठा दावा केलाय. राणेंना अटक झाली तेव्हा शाहांनी उद्धव ठाकरेंना फोन केला असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. नारायण राणेंनी केलेल्या दाव्याला गिरीश महाजन यांनी देखील दुजोरा दिलाय. नारायण राणे सांगत असतील तर त्यात तथ्य असेलच असं विधान गिरीश महाजन यांनी केलंय.
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांकडून राजकारण सुरुय. दिशा आणि सुशांतची आत्महत्याच आहे. मात्र, राजकारण्यांनी त्याला हत्येचा रंग दिल्याचं म्हणत संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय. तर दिशा मृत्यू प्रकरणातील आरोपींना
अटक करण्याची मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केलीय.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करुन चौकशी सुरु करावी अशी मागणी नारायण राणेंनी केली. दरम्यान कारवाईसाठी दिरंगाई का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. दिशा सालियनचा बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केलाय. तसंच दिशाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं स्वीकारली असून त्यावर 2 एप्रिलला सुनावणी होणारय. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालय कोणता निर्णय देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.