कर्जत[नेरळ]: सुमित क्षीरसागर
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे स्थानकाजवळच आजाद बेकरी येथील रस्ता हा रहदारीचा मार्ग आहे. येथूनच राजेंद्रगुरुनगर या नेरळमधील सगळ्यात मोठ्या गृहसंकुलात जाण्यासाठी देखील रस्ता आहे. त्यामुळे हा मार्ग कायम पादचारी यांच्याकडून व्यस्त असतो. मात्र गेले अनेक वर्षे हा रस्ता केलाच नसल्याने येथील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. तर येथील नागरी वस्तीत रस्त्यावर गटाराचे पाणी साचले असून बाजूलाच कचऱ्याचा ढीग लागत असतो. तर हा कचरा उचलायला नेरळ ग्रामपंचायतीची गाडी येत नसल्याने त्यातून दुर्गंधी सुटून येथूल चालणाऱ्या नागरिकांचे नाक मुठीत धरून चालावे लागते. अनेकदा ग्रामपंचायतीला तक्रारी करून ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने येथील नागरिक आता आक्रमक होत रस्त्यावर आले आहेत. तसेच सुविधा मिळण्यासाठी आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
नेरळ हि जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. आर्थिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने देखील नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार मोठा आहे. येथील कर्मचारी संख्या देखील जास्त आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेने नेरळ जोडले गेले आहे. त्यामुळे मागील काही काळात येथे नागरीकरण झपाट्याने होत आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार नेरळ शहराची लोकसंख्या १८ हजार ४२९ एवढी होती. परंतु सद्यस्थितीत झपाट्याने वाढत असलेला परिसर व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सद्यस्थितीत नेरळची लोकसंख्या अंदाजे ४० ते ५० हजाराच्या आसपास जाऊन पोहोचली आहे. तर येथील गाव हा शहरीकरणाकडे झुकला असल्याने येथील नियोजनासाठी नेरळ संकुल विकास प्राधिकरणाची निर्मिती नगररचना विभागाने केली होती. असे असताना देखील सध्या नेरळ ग्रामपंचायतीला नाकापेक्षा मोती जड झाल्याचे चित्र आहे. नेरळ शहराच्या मध्यभागी असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकाजवळ नेरळ येथील जुन्या आजाद बेकरी रस्ताची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चालणे नागरिकांना जोखमीचे झाले आहे. गेले अनेक वर्षे हा रस्ता बनवण्यात आलेला नाही. त्यामुळे परदेशी यांच्या घराजवळील मोरी फुटली आहे. तर पुढे कचऱ्याचे ढीग साठून राहत असल्याने कचऱ्याची मोठी दुर्गंधी सुटते. तसेच हिंस्र श्वान, कावळे यांची रेलचेल असल्याने लहान मुलांना चालणे जोखमीचे होत आहे. तसेच येथे सोनोग्राफी सेंटर आहे. त्यामुळे रुग्ण याठिकाणी येत असतात. मात्र येथून येण्याचा मार्ग हा अत्यंत निमुळता असल्याने आणि अवैध पार्किंगचा रस्त्याला विळखा पडत असल्याने रुग्णांना घेऊन येणाऱ्या रिक्षा यायला अडचण निर्माण होते. तर रुग्णवाहिका देखील यायला रस्ता नसल्याने काही नागरिकांच्या जीवावर बेतले असल्याचे भयावह वास्तव आहे.
याबाबत नेरळ ग्रामपंचायतीला अनेकदा सांगून सुद्धा आमचा विचार केला जात नाही. आम्ही माणसं नाहीत का असा जळजळीत प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. तर आता रस्ता, गटार, स्वच्छ परिसर या सुविधा ग्रामपंचायतीने आम्हाला दयाव्यात हा आमचा मूलभूत अधिकार आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. तेव्हा आता ग्रामपंचायतीला जग येणार कि नागरिकांना हक्कासाठी आंदोलन करावे लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
⏩️ आजाद बेकरी येथिल हा रस्ता राजेंद्रगुरूनगर, सम्राटनगर मधील नागरिक नेरळ रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठ येथे जाण्यासाठी नागरिक वापरतात. तर येथे मोठी लोकवस्ती असून हा जवळचा मार्ग आहे. तरीदेखील या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कचऱ्याचा ढीग लागत असून नेरळ ग्रामपंचायत कचरा उचलण्यासाठी गाडी पाठवत नाही. तर दुसरीकडे या रस्त्यावर दुचाकी पार्क केल्या जातात त्यामुळे रुग्ण, जेष्ठ नागरिक याना सोनोग्राफी सेंटर पर्यंत पोहचणे किंवा येथून चालण्यासाठी जिकरीचे होते. तसेच या रस्त्यावर रुग्णवाहिका यायला जागा नाही. आमच्या इमारतीमध्ये रुग्ण असून त्यांना त्यांच्या आईला दवाखान्यात घेऊन जावे लागते त्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत नेरळ ग्रामपंचायतीला आम्ही वारंवार सांगितले मात्र आमच्याकडे लक्ष दिले जात नाही.
▶️ दानिश लोगडे, रहिवासी
⏩️ हा रस्ता पूर्ण खराब आहे. येथे गटार, रस्ता पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे येथून चालताना, दुचाकीचालक रोज घसरून पडून अपघात होत असतात. त्यामुळे पुढील काळात कुणी गंभीर जखमी होय नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कचऱ्याची गाडी येत नाही. आली तर १५ दिवसांनी येते. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकला जातो त्याने दुर्गंधी सुटून आम्हाला घरात बसने जीवावर येते. डासांची संख्या वाढून मुले आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येथील प्रत्येक घरात कुणीतरी आजारी आहेच. गटार उघडी आहेत ते बंद केले जावे. कोरोननांतर खरंतर स्वच्छतेची काळजी घेणे हे नागरिकांसोबत प्रशासनाचे कर्त्यव्य आहे. मात्र मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते हे चिंताजनक आहे.
▶️ रशिदाबेन, रहिवासी
⏩️ झोया मेडिकल पासून गटारउलटून या रस्त्यावर पाणी भरत त्यामुळे येथून चालताना गटाराच्या घाण पाण्यातून वाट काढावी लागते. हा रस्ता थेट मोहचीवाडी पर्यंत जातो. तेव्हा जवळचा रस्ता असल्याने हा रस्ता नागरिकांकडून वापरला जातो मात्र सुविधा नसल्याने हा रस्ता त्रासदायक ठरत आहे.
▶️ आत्माराम जाधव, रहिवासी
⏩️ या रस्त्यासाठी आम्ही देखील आग्रही आहोत नागरिकांकडून तक्रारी आल्यावर आम्ही वेळोवेळी मीटिंगमध्ये याबाबत चर्चा केली आहे. वरिष्ठांकडे निधीसाठी मागणी केलेली होती. तेव्हा हा रस्ता नेरळ संकुल विकास प्राधिकरणातून मंजूर असल्याचे समजते. सोमवारी याबाबतचे अधीकृत कागदपत्रे तपासून याबाबत मी स्वतः या ठिकाणावरील रहिवास्यांना भेटेन. होणार रस्ता हा चांगला आणि गटार व्यवस्थित असें याबाबत काळजी घेतली जाईल. तसेच येथे कचरा उचलण्यासाठी मुकादम याना सूचना दिल्या आहेत.
▶️ उषा पारधी, सरपंच, नेरळ ग्रामपंचायत