![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2025/02/1001057800.jpg)
*मुंबई l 06 फेब्रुवारी-* क्रिकेटचे ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक असणारे द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. मुंबईच्या लीलावती रूग्णालयामध्ये द्वारकानाथ यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तम लेखक आणि समीक्षक असणाऱ्या द्वारकानाथ यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संझगिरी यांनी मराठी भाषेत क्रिकेट लेखनाच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना वेगळ्या शैलीत हा खेळ समजावून सांगितला. त्यांचे हलक्याफुलक्या शैलीतील लेखन आणि समालोचन चाहत्यांना नेहमीच भावत राहिले. सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या संझगिरी यांनी मुंबई महापालिकेत उच्च पदावर काम केले, मात्र क्रिकेटवरील प्रेम आणि लेखनकौशल्यामुळे ते लोकप्रिय समीक्षक झाले.
द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईत दादर येथील हिंदू कॉलनीत झाला. त्यांचं शालेय शिक्षण किंग्ज जॉर्ज तर महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईयामध्ये झालं. यानंतर व्हीजेटीआयमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.
क्रीडा क्षेत्रातील समीक्षणाबरोबरच संझगिरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. 2008 मध्ये ते मुख्य अभियंता आणि त्यानंतर पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरी एकपात्री स्टँडअप टॉक शो करत आहेत आणि त्यांनी आजपर्यंत हजाराहून अधिक असे कार्यक्रम केले आहेत. द्वारकानाथ संझगिरी यांनी १९७० च्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या लेखन कारकीर्दीला सुरुवात केली होती.
भारताने १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संझगिरी यांनी ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते. याचे ते संपादक होते. फेसबूकवरही ते क्रिकेट आणि चित्रपटांविषयी लिहायचे, हे लिखाण युवा पिढीला खूप आवडायचे. द्वारकानाथ संझगिरी स्तंभलेखनासोबतच प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.