सावंतवाडीच्या गंजीफा, लाकडी खेळण्यांना ‘जीआय’ मानांकन; ‘गंजीफा’ देणार पंतप्रधान मोदींना भेट…

Spread the love

सावंतवाडीची लाकडी खेळणी आणि गंजीफा सुप्रसिद्ध आहेत. या लाकडी खेळण्याला आणि गंजीफाला जीआय मानांकन प्राप्त झालं आहे. त्यामुळे सावंतवाडीतील कलावंतांना आता अच्छे दिन येणार आहेत. “हा गंजीफा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देणार आहोत,” असं युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी सांगितलं आहे.

सिंधुदुर्ग : ऐतिहासिक सावंतवाडी लॅकरवेअर्स यांच्या ‘गंजीफा’ या कलेसाठी आणि सावंतवाडीतील सुप्रसिद्ध ‘लाकडी खेळणी’ यांना भौगोलिक (जीआय) मानांकन प्राप्त झालं आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी राजघराण्याचे राजे खेमसावंत भोसले आणि राणीब शुभदादेवी भोसले यांनी दिली‌. मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गंजीफा’ भेट स्वरुपात देणार असल्याचं युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या. तर सावंतवाडीत गंजीफाचं म्युझिअम व्हावं, अशी राजमाता दिवंगत सत्वशीलादेवींची इच्छा होती. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, असं युवराज लखमराजे भोसले यांनी सांगितलं. राजवाडा येथील पत्रकार परिषदेप्रसंगी युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, अ‍ॅड. समीक्षा दाभाडे आदी उपस्थित होते.

रोजगारासाठी ठरणार महत्त्वपूर्ण….

भारत सरकारकडून सावंतवाडी लॅकरवेअर्स यांच्या ‘गंजीफा’ या कलेसाठी आणि सावंतवाडीतील सुप्रसिद्ध ‘लाकडी खेळणी’ यांना भौगोलिक (जीआय) मानांकन प्रदान करण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भौगोलिक मानांकन मिळण्यास सुरुवात झाली आहे. “यावर्षी सावंतवाडी गंजिफा कार्ड आणि खेळण्यांना जीआय नामांकन मिळालं. सिंधुदुर्गसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तर रोजगारासाठी देखील हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे,” असं मत अ‍ॅड समीक्षा दाभाडे यांनी व्यक्त केलं.

गंजीफा कार्डवर विष्णूचे दहा अवतार…..

“गंजीफा म्हणजे खजिना, या गंजीफा कार्डवर विष्णूचे दहा अवतार आहेत‌. 17 व्या शतकात गंजीफा सावंतवाडीत आला. खेमसावंत तिसरे यांच्या काळात कलेला प्रोत्साहन दिलं गेलं. तद्नंतर राजे शिवरामराजे आणि राजमाता सत्वशीलादेवी यांनी ही कला जोपासली. पुंडलिक चितारी यांच्या माध्यमातून ही कला पुढील पिढीपर्यंत पोहोचवली. नव्या पिढीला ही कला शिकवली. आजही गंजीफा राजवाड्यात तयार केला जातो. ही परंपरा युवराज लखमराजे आणि श्रद्धाराजे पुढं घेऊन जातील असा विश्वास आहे. आजच जीआय मानांकन मिळण्यासाठी आमच्या गंजीफा कलावंतांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. नवीन कलावंत देखील पुढं येत आहेत. शासनानं या कलेसाठी आणि कलावंतांसाठी हितकारक योजना सुरु केल्यास आणखीन कलाकार पुढं येतील,” असं मत राणी शुभदादेवी भोसले यांनी व्यक्त केलं.‌

सावंतवाडीसाठी गौरवास्पद बाब….

“गंजीफाला जीआय मानांकन मिळालं, ही सावंतवाडीसाठी गौरवास्पद बाब आहे. ही कला जोपासण्यासाठी 25 कलाकार कार्यरत असून 125 कलाकार कसे तयार होतील, यासाठी आमचा प्रयत्न आहे. गंजीफामध्ये 14 प्रकार सावंतवाडीत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला गंजीफा पोहोचला आहे. देशातील स्मार्ट सीटीत गंजीफा आहे‌. ही कला अजून पुढं घेऊन जायची आहे. तर मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावंतवाडीचा हा गंजीफा भेट स्वरूपात द्यायचा आहे,” असं युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या. तर “राजमाता सत्वशीलादेवी यांची इच्छा होती की गंजीफा म्युझिअम सावंतवाडीत व्हावं. त्यादृष्टीनं आमचा प्रयत्न असणार आहे. शासनाकडून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या कलेला जीआय मानांकन मिळाल्यामुळं निश्चितच हे स्वप्न साकार होईल,” असा विश्वास युवराज लखमराजे भोसले यांनी व्यक्त केला.

नवीन पिढीला कळेल गंजिफा खेळ….

यावेळी राजे खेमसावंत भोंसले म्हणाले, “राजे शिवरामराजे आणि राजमाता सत्वशीलादेवी यांनी या कलेसाठी आणि त्या टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. नवीन पिढीला गंजिफा खेळ कळेल, यासाठी आमचा अधिक प्रयत्न असतो. जीआय मानांकन मिळाल्यामुळे निश्चितच त्यात अधिक भर पडेल. चितारआळी बाजारपेठेत लाकडी खेळणी आजही बनत आहेत. नवी पिढी देखील राजवाड्यात गंजीफा बनवत आहे.” यावेळी गंजिफा कलाकार मोहन कुलकर्णी, लाडू ठाकूर, रामचंद्र ठाकूर, सदाशिव धुरी, पांडुरंग धुरी, सचिन कुलकर्णी, वर्षा लोंढे, गायत्री कुलकर्णी, प्रज्ञा पांचाळ, संगिता कुंभार, आत्माराम नार्वेकर, सोनाली कुंभार, सुकन्या पवार, प्रेरणा वाडकर, आर्या देवरूखकर, वेदीका गावडे, संजना कदम, निकिता आराबेकर, सिताराम गवस, परशुराम मेस्त्री, मधुकर सोनावडेकर आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page