
सावंतवाडी/प्रतिनिधी:- सावंतवाडी कारागृहाची संस्थानाकालीन, किमान शंभर वर्षांहून अधिक जुनी असलेली मुख्य संरक्षक भिंत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज, शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास कोसळली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भिंत संस्थानकालीन असल्याने तिच्या बांधकामाला १०० वर्षांहून अधिक काळ लोटला होता. गेले तीन दिवस सावंतवाडी आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळध पावसामुळे या जुन्या भिंतीच्या पायाला धोका निर्माण आणि अखेर ती कोसळली. सुदैवाने, ही घटना घडली तेव्हा भिंतीजवळ कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच काही जागरूक नागरिकांनी आणि पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या भिंतीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असताना, कारागृहातील जेलरने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जेलरने छायाचित्रणास मज्जाव केल्याने, प्रशासनाकडून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेषतः जुन्या आणि ऐतिहासिक वास्तूंच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. कोसळलेल्या भिंतीमुळे कारागृहाच्या एका बाजूला मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ज्यामुळे तात्पुरत्या सुरक्षेची व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे.
या घटनेबाबत कारागृह प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या भिंतीच्या पुनर्बाधणीसाठी आणि कारागृहाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात