साताऱ्याचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (वय ७६) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (वय ७६) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या.
वयाच्या ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास –
रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २६ जुलै १९४८ रोजी सैनिकी परंपरा असणाऱ्या सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील बर्गे कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. १६ मे १९६८ रोजी त्यांचा श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला.
प्रशासकीय, राजकीय जीवनात खंबीर साथ -सनदी अधिकारी म्हणून प्रशासकीय आणि त्यानंतर राजकीय, सामाजिक जीवनात रजनीदेवी यांनी श्रीनिवास पाटील यांना खंबीर साथ दिली. त्यांचे पार्थिव कराडमध्ये आणले जाणार आहे. कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
रूढी, परंपरा जपणाऱ्या ‘माई’ –
रजनीदेवी यांना सर्वजण ‘माई’ या नावाने संबोधत असत. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. उच्चशिक्षित असून देखील जुन्या रूढी परंपरा, संस्कृती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या पश्चात पती खासदार श्रीनिवास पाटील, मुलगा सारंग, सून रचनादेवी, नात अनुसया, नातू अंशुमन, असा परिवार आहे.खा. श्रीनिवास पाटील यांची प्रशासनिक आणि राजकीय कारकिर्द अत्यंत गाजलेली अशी आहे. त्यांनी प्रशासनामध्ये अत्यंत धडाडीचे निर्णय घेतले. पुणे जिल्ह्यातील महत्वाचे मोठे प्रकल्प नुसतेच मार्गी लावण्यात नाही तर ते पूर्णत्वास नेण्यात श्रीनिवास पाटील यांचा सनदी अधिकारी या नात्यानं मोलाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या साथीनं राजकारणात प्रवेश केला. त्यांची ही राजकीय कारकीर्दही आजपर्यंत कोणत्याही वादाशिवाय गाजलेली आहे. काही काळ ते सिक्कीमचे राज्यपालही होते. या सगळ्या भूमिका पार पाडताना, त्यांच्या पाठीशी रजनीदेवी पाटील या ठामपणे उभ्या असत. हीच त्यांची सर्वात मोठी खासियत होती.