मुंबई- बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी न्याया मिळावा अशी मागणी घेऊन देशमुख कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी मुख्यमंत्री आणि देशमुख कुटुंबीय यांच्यात तासभर चर्चा झाल्याचे समजते. यावेळी भाजप आमदार सुरेश धस हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण मारेकऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल, जेणेकरून गुन्हेगारांना एक संदेश मिळेल की कोणालाही माफ केले जात नाही, असा शब्द देशमुख कुटुंबीयांना दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी देशमुख म्हणाले, ‘या प्रकरणात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना माफी नाही. यामागे कुणीही असेल त्याला शिक्षा मिळेल असे आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले आहे. धनंजय देशमुख पुढे म्हणाले, आम्ही एफआयआर आणि पुरावे मुख्यमंत्र्यांना दाखवले आहेत, त्यावर सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सीडीआर काढा अशी मागणी केली आहे. आमची भूमिका केवळ न्यायाची आहे. या प्रकरणाचा नि:पक्षपातीपणे तपास झाला पाहिजे आणि यामागील मुख्य सुत्रधाराला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच तपासाचा अहवाल दोन दिवसांत मिळणार असल्याचेही देशमुखांनी सांगितले.
निष्पक्षपातीपणे या गुन्ह्यामध्ये तपास झाला पाहिजे अशी भूमिका आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याचेही धनंजय देशमुख म्हणाले. या गुन्ह्यामध्ये कोणीही असले तरी त्याला शिक्षा होणार असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण? हे समोर आले पाहिजे अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या तपासासंबंधी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, आम्ही ज्या एफआयआर आहेत त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर घटना घडली त्या कालावधीमधील सर्वांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सर्व तपास करा असेही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.