मुंबई- संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी पोलिसांचा योग्य तपास सुरू आहे. आरोपींना फासावर चढवणं हा आमचा प्रयत्न आहे. मी मंत्री म्हणून प्रकरणाच्या तपासावर दबाव येऊ नये म्हणूनच सीआयडी तपास करण्यात येत आहे, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा आणि आरोपींना फासावर चढवावा ही आमची भूमिका आहे. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा ही मागणी मी नागपूरच्या अधिवेशनातच केली आहे.
वडेट्टीवार बोलायला हुशार…
धनंजय मुंडे म्हणाले की, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे बोलायला हुशार आहेत. पण आशा पद्धतीने छोटा आका आणि मोठा आका ही भाषा मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. कुणाचा एन्काउंटर अन् कुणाचा काय. पोलिस आणि सीआयडी हे चांगला तपास करत आहे.
न्यायालयीन तपास होणार…
धनंजय मुंडे म्हणाले की, हा तपास न्यायालयीन देखील होणार आहे. मी मंत्री आहे म्हणून त्यावर माझा काही प्रभाव होईल असे काहीच नाही. म्हणूनच सीआयडीकडे तपास दिला आहे. हे का घडत आहे हे माध्यमांना जास्त कळत आहे. मी मंत्री, पालकमंत्री का नसावेही हे म्हणणाऱ्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे.
पालकमंत्रीपदाबाबत अजित पवार निर्णय घेतील…
धनंजय मुंडे म्हणाले की, सर्वपक्षीय आमदार हे संतोष देशमुख यांच्या जी हत्या झाली त्याच्याविरोधात एकवटले आहेत. ते काही चुकीचे झाले हे मी म्हणू शकत नाही. बिनखात्यांचे मंत्री कसे ठेवता येते हे शासनाने त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे, असा टोलाही त्यांनी प्रकाश सोळंके यांना नाव न घेता लगावला आहे. बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवार हे निर्णय घेतील.
जर तरच्या चर्चेवर बोलणार नाही..
धनंजय मुंडे म्हणाले की, अजित पवार यांनी शरद पवार यांची केवळ वाढदिवसानिमित्त भेट घेतली होती. दोन्ही पक्ष एकत्र येणार ह्या जर तर च्या चर्चेवर मी भाष्य करणार नाही.