अनधिकृत बांधकामामुळे रस्ता झाला अरुंद ; धामोते येथील संजय विरले करणार कुटुंबासह आमरण उपोषण,

Spread the love

नेरळ: सुमित क्षीरसागर

नेरळ जवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमध्ये धामोते येथे गावठाण जागेत कोल्हारे ग्रामपंचायत सदस्याचे बांधकाम सुरु आहे. हे काम करताना संबंधित सदस्याने येथील संजय विरले या ग्रामस्थाचा रस्ता बंद करून टाकला आहे. तर संजय विरले यांनी याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्याने आपल्या हक्कासाठी विरले यांनी आता थेट जिल्हा परिषद गाठणार आहेत. येत्या १२ फेब्रुवारीला संजय विरले हे जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांना सादर केले आहे. तर न्यायाशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका विरले यांनी घेतली आहे. ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे हद्दीतील धामोते येथील गावठाण जागेमध्ये कोल्हारे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रोशन म्हसकर यांनी घराचे बांधकाम सुरु केले आहे. या ठिकाणाहून गावातील रहिवासी असलेले संजय विरले यांचा पूर्वापारपासूनचा रस्ता होता. तो रस्ता बांधकामामुळे बंद झाला आहे. त्यामुळे याविरोधात संजय विरले यांनी न्याय मागितला आहे. म्हसकर यांचे बांधकाम बेकादेशीर असल्याने माझ्या घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अनधिकृत बांधकाम गावठाण जागेमध्ये करण्यास परवानगी दिली तसेच उपसरपंच रोशन म्हसकर यांचे आई यांनी ग्रामपंचायत गावठाण जागेची अनधिकृत खरेदी केली आहे यामध्ये सरपंच उपसरपंच यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत मला न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करीत आहे परंतु आजपर्यंत मला न्याय मिळाला नाही अशी खंत तक्रारदार संजय विरले यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. दिनांक ७ जानेवारी रोजी या विरोधात तक्रारदार विरले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्जत येथे येत असताना कुटुंबासमवेत पंचायत समिती कार्यालय येथे आमरण उपोषण केले होते. त्यावेळी उपोषण मागे घेण्यासाठी पंचायत समिती कर्जतचे गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी लेखी पत्राद्वारे चालू असलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ बंद करण्यात येईल व जोपर्यंत पुढील आदेश येत नाही नाहीत तोपर्यंत बांधकाम करण्यात येऊ नये तसेच चौकशी करून दोषी असतील यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे लेखी आदेश दिले होते. मात्र बांधकाम सुरूच असल्याने गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या. तेव्हा तक्रारदार संजय विरले यांनी आता आक्रमक पवित्र घेतला असून रोशन म्हसकर यांचे सुरू असलेले बांधकाम जागेवरून काढून टाकण्यात यावे व सरपंच उपसरपंच यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई चौकशी करून करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक १२ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद रायगड येथे कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा विरले यांनी दिला आहे. तर बांधकाम हटवल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. तेव्हा धडक निर्णयासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड हे आता संजय विरले याना न्याय मिळवून देणार का ? कि विरले यांना आणखी संघर्ष करावा लागणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page