
छत्रपती संभाजीनगर- नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे बोट धरत राजकारणात आलो असे जाहीर सभेत सांगितले होते. मदत केली हे सांगणारे तुम्ही कोण आहात? असे म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. अमित शहा यांना शिवसेनाप्रमुखांनी मदत केली नाही हे नाकारत नाही. मदत केली आहे. पण संजय राऊत यांनी स्क्रिप्ट लिहिली आहे.
संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, नातं जपणं हा वेगळा भाग आहे. शिवसेनाप्रमुखांनी नात्याचा कधीही राजकारणासाठी वापर केला नाही. संजय राऊत यांचे पुस्तक हे केवळ प्रसिद्धीसाठीचे आहे.संजय राऊत खरं कधीच बोलणार नाही. एखाद्या दरोड्यासारखा आहे. पुढे कसा दरोडा टाकायचा ही दरोडेखोराची मानसिकता असते, तीच राऊतांची मानसिकता आहे. ही स्क्रिप्ट आहे. मनाने घडवलेली स्क्रिप्ट आहे.
*शिवसेनाप्रमुखांचा असा उल्लेख करणे गैर…*
संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांनी अनेकांना मदत केली, बोलून दाखवले नाही. शिवसेनाप्रमुखांचा असा उल्लेख करणे गैर आहे. शिवसेनाप्रमुखांची गोध्राबाबतची भूमिका काय होती त्यावर स्पष्ट बोलले पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी काही चोरी चपाटी केली नाही.
*राऊतांवर केली टीका…*
संजय राऊत प्रसिद्धीसाठी बोलत असतात. त्यांना वाटते मी जे बोललो किंवा लिहले ते खरे आहे असे लोकांनी मानले पाहिजे, असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील अनेकांना मदत केली, पण कधीच बोलून दाखवले नाही.
*चित्रपटाच्या स्टोरीसारखे पुस्तक..*
संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मोठे झालेले नाही. त्यांनी अनेकांना मदत केली आणि त्याबद्दल कुणाला काही समजू देखील दिले नाही. यामुळे लोकं त्यांचा आदर करतात. त्यांच्यामुळेच आमच्यासारखे अनेक लोकं मोठे झाले आहेत. यामुळे संजय राऊत यांनी जे पुस्तक लिहले आहे, ते केवळ चित्रपटाची स्टोरी लिहल्यासारखं लिहले आहे. यातून त्यांना स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची आहे. संजय राऊत काही करू शकतात. इंग्रजीत लिहतील आणि राहुल गांधी परदेशातील विद्यापीठात जातील आणि तिथे या पुस्तकाचे प्रकाशन करतील. यांना राहुल गांधी हे शिवसेना प्रमुखांपेक्षाही मोठे वाटतात, हे सत्य आहे.
*तुम्ही का दलाली करतात..*
संजय शिरसाट म्हणाले की, मुंबईमध्ये शिवसेना वाढीसाठी कोण कारणीभूत होते हे कधी कुणी सांगितले नाही. शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना वाचवले हे जर त्यांनी स्वत: सांगितले तर त्या गोष्टीला महत्त्व आहे. पण तुम्ही का दलाली करतात. तुम्हाला जर हे खरं वाटत असेल तर त्यांच्यातोंडून हे बाहेर पडू द्या ना.
*ठाकरे- पवारांचा पक्ष ‘लोफर’ व्यक्तींच्या हातात दिला- संजय राऊत…*
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘नरकातले स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. तो सत्य आहे, ती कादंबरी नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.