दिव्यात पाणीटंचाई, अनधिकृत बांधकामे आदी समस्यांबाबत आ.संजय केळकर यांचा इशारा..

Spread the love

बैठका आणि चर्चा नाही; आता अधिकाऱ्यांना घेराव..

ठाणे; निलेश घाग अनेक बैठका, चर्चा, पुराव्यानिशी तक्रारी, आंदोलने होऊनही अनधिकृत बांधकामांबाबत कारवाई झाली नाही, त्यामुळे आता चर्चा बैठका न करता थेट संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

शहरातील विविध समस्यांबाबत आमदार संजय केळकर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी विविध विभागातील समस्याग्रस्त दीडशेहून जास्त नागरिक उपस्थित होते. बैठकीत श्री.केळकर यांनी दिव्यातील पाणी टंचाई, शहरात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे, वाहतूक कोंडी आदी समस्या निदर्शनास आणून दिल्या.

ठाणे शहरात आजही अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. याची छायाचित्रेही सादर करण्यात आली आहेत. या अनधिकृत बांधकामांमुळे उपलब्ध सोयी सुविधांवर ताण पडतो तसेच सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होतेच, शिवाय महापालिकेलाही आर्थिक तोटा सहन करावा लागतो. कारवाई होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव येत असेल तर त्याला न जुमानता कारवाई करण्यात यावी. यापुढे बैठका आणि चर्चा न होता संबंधित अधिकाऱ्याला भाजपचे युवा कार्यकर्ते घेराव घालतील, असा इशारा श्री.केळकर यांनी बैठकीत दिला.

दिव्यात नियोजनाअभावी पाणीटंचाई भेडसावत आहे. काही ठिकाणी फक्त रात्रीच पाणी मिळते. चाळीच्या ठिकाणी आता इमारती झाल्या असल्या तरी पाणी मात्र तेवढेच मिळत आहे. मुख्य जलवाहिनीतून उप जोडण्या पुरेशा प्रमाणात दिलेल्या नाहीत. परिणामी दिव्यात पाणी टंचाई भेडसावत असून टँकर लॉबी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. जर पाणी मिळणार नसेल तर दिवेकरांनी बिलेही भरू नयेत, असे आवाहन श्री.केळकर यांनी केले.

या बैठकीत लोढा स्टर्लिंग, बाळकुम नाका ते कोलशेत येथील रस्त्याचे रखडलेले काम, वीज वितरण कंपनीचे केबल टाकण्याचे अर्धवट राहिलेले काम, कंत्राटी कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले, इमारत क्र.५४ आणि ५५ च्या सफाई कामगारांना हक्काची घरे, कोलशेतकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे, ठाणे रेल्वे स्थानक गावदेवी मंदिर, हनुमान मंदिर परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि पार्किंग आदी समस्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

दिवा पूर्व आणि पश्चिम अशी सव्वाशे मिटरची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामाची लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे परिसरातील पाणीटंचाई बऱ्याच अंशी सुटण्याची शक्यता आहे.

बैठकीस नगर अभियंता श्री.सोनग्रा, अतिक्रमण उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तुषार पवार, स्मार्ट सिटी विभागाचे श्री.ढोले आदी उपस्थित होते. तर परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सूरज दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page