
दीपक भोसले/संगमेश्वर- महापराक्रमी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे ज्या वाड्यात वास्तव्यावर होते, तो सरदेसाई यांचा वाडा छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत असून कसबा गावातही आनंदाचे वातावरण आहे. सर्व पंचक्रोशी मध्ये व छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिवभक्तांना व हिंदू प्रेमिना आनंद व अभिमान झाला आहे.
संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे ही आमची इच्छा परंतु सरकारने आम्हाला विश्वासात घेऊन स्मारक बनवावे – सुभाष उर्फ बाळ देसाई
आमच्या सरदेसाई वाड्यावर स्मारक उभारण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू . सरकारने आम्हाला विश्वासात घेऊन स्मारकाची ब्ल्यु प्रिंट दाखवावी, अशी भूमिका सुभाष उर्फ बाळ सरदेसाई यांनी ‘पत्रकारांशी ‘ बोलताना व्यक्त केली.
सरदेसाई म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. संगमेश्वरमध्ये मागील ३६ वर्षात आतापर्यंत तीन ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र ही स्मारके पूर्ण झाली नाहीत. आमच्या सरदेसाई वाड्यावर स्मारक बांधण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.मात्र त्यापूर्वी स्मारक कसे असेल आणि त्याचे नियोजन आम्हाला सादर करण्यात यावे. यापूर्वी सन १९९३ साली मी स्वतः पुढाकार घेऊन कसबा येथील चौकामध्ये संभाजी महाराजांचे अर्थ प्रतिमा स्थापन केली.सरदेसाई या ठिकाणी स्मारक व्हावे आणि ती जागा विकसित करावी अशी भावना आहे मात्र त्या अगोदर सरकारने आम्हाला विश्वासात घ्यावे असे सरदेसाई म्हणाले.
स्मारक होणार याचा आनंद – सरपंच पूजा लाणे
कसबा गावात धर्मवीर छत्रपती संभाजी स्मारक होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. या स्मारकासाठी सरपंच या नात्याने पूर्णपणे सहकार्य करेन. छत्रपती संभाजी महाराज यांचे या ठिकाणी स्मारक झाल्यास पर्यटक विकास होऊन कसबा गावाचा ऐतिहासिक वारसा जगापुढे जाईल. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्राम पातळीवर संभाजी स्मारकासाठी लागेल ते सहकार्य देण्यासाठी आपण कटिबंध राहो असा विश्वास कसबा गावच्या सरपंच पूजा लाणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला