संगमेश्वर रेल्वेस्थानकात तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा; संगमेश्वरवासीयांच्या मागणीला कोकण रेल्वे प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता?…येत्या २६ जानेवारीला संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे लाक्षणिक उपोषणाचा इशारा…

Spread the love

संगमेश्वर- २४ जुलै २०२४ रोजी आपल्या मागण्या आणि त्या संदर्भात आमदार शेखर निकम आणि निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे सदस्य यांची बैठक कोकण रेल्वेच्या बेलापूर मुख्यालयात पार पडली. तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा हा सकारात्मक प्रस्ताव दिनांक ३० जुलै रोजी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला. परंतु गेल्या पाच महिन्यांत या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून पत्राद्वारे कळविण्यात आले.

या पत्रात सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी थांबा दिलेल्या नागपूर मडगाव आणि नेत्रावती एक्स्प्रेसचा उल्लेख केला आहे. सदरचे थांबे हे यापूर्वीच्या मागणीनुसार दिले होते. परंतु या पत्रात त्याचा उल्लेख करून जेवढं दिलं आहे त्यावर समाधान माना! असे तर रेल्वे बोर्डाचे आणि कोकण रेल्वेचे म्हणणे नाही आहे ना? रोहा, सिंधुदुर्ग, सावंतवाडीच्या रेल्वे स्थानकावर थांबे याचवर्षी मिळाले. मग संगमेश्वर तालुक्यातील जनतेवर अन्याय का? या आंदोलनात सर्वसामान्य माणूस स्वतःचा वेळ, पैसा खर्ची घालतो आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचे पाठबळ या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर या फेसबुक ग्रुपला नाही. मग संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या मतांवर सत्तारूढ होणाऱ्यांचे काही एक कर्तव्य नाही का? असा सूर आता जनतेमधून उमटत असल्याचे बघायला मिळत आहे.

संगमेश्वर तालुक्यात किती राजकीय पक्ष आहेत आजी माजी आमदार, मंत्री, पुढारी आहेत. जर या प्रश्नाकडे साधी नजर फिरवली असती तर जे दृश्य रोहा, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी येथील लोकप्रतिनिधींमुळे रेल्वे थांबा मागणी संदर्भात दिसते आहे, कदाचित संगमेश्वर रेल्वे स्थानकावरसुद्धा दिसले असते. कोणी किती लढे द्यायचे त्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे. आपल्या मागण्या कशा रास्त आहेत ते पटवून द्यायला हवे. या सर्व प्रकारात कोकण रेल्वे आपली जबाबदारी चोख पार पाडत नसल्याने हा गोंधळ माजला आहे, असे जनतेचे म्हणणे आहे. या सहा वर्षात रेल्वे संबंधित आंदोलन असेल मागण्यांचा पाठपुरावा असेल ते काम पत्रकार संदेश जिमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम पार पाडले आहे. आता कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्ड यांना जोपर्यंत आरसा दाखवत नाही तोपर्यंत थांबायचे नाही. मागणी अमान्य झाल्यास २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी संगमेश्वर रेल्वे स्थानकावर उपोषण सुरू केले जाईल. अशी माहिती पत्रकार संदेश जिमन यांनी दिली आहे. त्यांच्या पाठीशी संगमेश्वर तालुक्यातील तमाम चाकरमानी, रेल्वे प्रवाशी, जनता जनार्दन खंबीरपणे उभी राहणार हे चित्र आताच स्पष्ट होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page