
रत्नागिरी : कोकणातील शिमगोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा भूमी अभिलेख विभागाकडून सनद वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्ताने कित्येक वर्ष गावठाणांमध्ये राहणार्या मूळ रहिवाशांना आता त्यांच्या सातबारावरचे महाराष्ट्र शासनाचे नाव जावून आता स्वतःच्या नावाचा सातबारा मिळणार आहे. शिमग्यानिमित्ताने चाकरमान्यांच्या हजेरीतच आता हा सनद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
शिवकालीन महाराष्ट्रात उत्तम कामगिरी बजावणार्यांना अथवा शिलेदार, अधिकारी यांना विशिष्ठ जागा नावावर केली जात असे. अशी जागा नावावर करण्यालाच महाराजांनी सनद बहाल केली, असे म्हटले जात असे. शिवकालीन साम्राज्यानंतर इंग्रजांच्या काळातही या व्यवहाराला सनद असेच म्हटले जात असे आणि आजही महाराष्ट्र शासनात अशा मिळकतींना सनद म्हणूनच ओळखले जात आहे.
१८३० साली इंग्रजांनी महसूल मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील शेतीयोग्य, उत्पादन देवू शकणार्या जमिनीचा सर्व्हे केला होता आणि या जमिनीतून शेतसारा मिळवला जात असे. यावेळी इंग्रजांनी रहिवासी क्षेत्र असलेल्या जमिनी गावठाण म्हणून या सर्वेमधून वगळल्या होत्या व आजतागायत या जमिनी गावठाण म्हणूनच ओळखल्या जात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवकालीन काळातील प्रसिद्ध अशा मुंबई बंदर व यापासून जवळ असलेल्या तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त गावठाण असे चित्र असे. त्यामुळे मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यांमध्ये जास्त रहिवासी गावठाणे आहेत आणि जसजसे आपण मुंबईपासून दूर होवू तसे त्या तालुक्यातील गावठाणांची संख्या होताना दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ५५७ गावांपैकी फक्त ५६४ गावे ही गावठाण क्षेत्र म्हणून ओळखली जातात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त २३ गावांमध्ये गावठाण आहेत.