भाजपा नेत्या, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव.
मुंबई | जानेवारी ०३, २०२३.
‘भारतीय नारी, जगात भारी’ असे आज अभिमानाने म्हणतो खरे; मात्र याची पायाभरणी झाली ती राष्ट्रयोगिनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. भारतीय संस्कृती उदात्त आहे; उन्नत आहे. मात्र पारतंत्र्याच्या अभिशापामुळे आणि तत्कालीन कर्मकांडाच्या दुष्प्रभावामुळे या संस्कृतीचा कणा असलेल्या ‘स्त्री’कडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात आला. मात्र ज्योतिबा नावाच्या एका महान तत्वचिंतकाने भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी असणारी स्त्री-शिक्षणाची आवश्यकता ओळखली आपल्या अर्धांगिनीला साक्षर केले. विद्यादेवी सरस्वती प्रसन्न झाल्यावर तिचे स्वरूप एका मर्यादित जागेत कसे बरे कोंडून राहील?
प्राचीन भारतात मैत्रेयी, गार्गी, लीलावती अशा महान विदुषी होऊन गेल्या. मध्ययुगीन भारत आक्रमकांच्या टापांखाली भरडला आणि त्यानंतर होणाऱ्या भीषण अतिप्रसंगांना टाळण्यासाठी ‘स्त्री’वर बंधने आली. पुढे ‘पुरुषसत्ताक’ विचारधारेने ही बंधने कायम ठेवली. यात सावित्रीबाईंचे धाडस आणि त्यांनी केलेले राष्ट्र उभारणीचे कार्य लौकिकास पात्र ठरते. एक स्त्री राजपुतांची चेतना महाराणी पद्मिनी, शिवबांची जिजाऊ, शंभू राजांची येसूबाई, झाशीची रणचंडिका लक्ष्मीबाई होते हा इतिहास भारताने पाहीला तद्वतच एक स्त्री अखिल भारतीय महिलांची प्रेरणा होऊ शकते हा तत्कालीन वर्तमान सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने उभ्या भारताने अनुभवला.
आज आपण मैत्रिणी अशा एका टप्प्यावर आहोत; जिथे सावित्रीआईचे स्त्री-शिक्षणाचे ध्येय पूर्णत्वास आले आहे. पण शिक्षण हे साधन घेऊन राष्ट्राची आराधना करण्यासाठी लढा सुरूच होता. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या घोषवाक्यात एक प्रश्न दोन्ही ठिकाणी उपस्थित होत होता. ‘कोणाची मुलगी शिकली? कोणाची प्रगती झाली?’ स्वातंत्र्योत्तर काळात अनेक सरकारे आली आणि गेली. मात्र या प्रश्नांवर ठोस उत्तर मिळाले नाही. मग आले मा. मोदीजी. ते म्हणाले ‘देश की बेटी’. चला एक उत्तर मिळाले. दुसऱ्या प्रश्नाचे काय? तर पुन्हा ते म्हणाले… आपण घोषवाक्यात बदल करू. ‘मुलगी शिकली, सक्षम झाली’. आता सर्व सोपे आहे. प्रथम जन-धन, नंतर इज्जत घर, त्यानंतर उज्ज्वला आणि अशी एक मालिका सुरु झाली. गणिताच्या भाषेत ‘towards infinity’ (अगणिताकडे).
आपल्या सावित्रीआईने आपल्याला शिक्षणाची गोडी लावली. ‘शिकून साऱ्याजणी’ आपण सजग नागरिक तर बनलो. पण सजग नेतृत्त्व करण्याची क्षमता ‘भारतीय नारी’त आहे. मात्र पुरुषसत्ताक राजकीय प्रभृतींनी १९९६ पासून महिलांच्या लोकप्रतिनिधित्वाच्या प्रश्नाला महत्त्व दिले नव्हते. मात्र आज नव्या संसद भवनाच्या शुभारंभाच्या निमित्ताने मा. मोदीजी, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावून संसदेत ‘नारी शक्ती वंदन विधेयक २०२३’ मांडले. विरोधकांनीही काळाची गरज ओळखून या विधेयकाला समर्थन दिले. आणि भारताच्या नव्या संसदेत विक्रमी मताधिक्याने हे विधेयक पारित होऊन महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीम. द्रौपदीजी मुर्मू यांच्या स्वाक्षरीने ‘नारी शक्ती वंदन कायदा २०२३’ पारित झाला. माझ्या मते स्त्री-शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाईला हीच सर्वोच्च श्रद्धांजली ठरेल.
#सावित्रीबाई_फुले_जयंती #SavitriBai_Fule