अहमदनगर :- भलामोठा वाहनांचा ताफा… छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा… वाहनात उभे राहून हात जोडून अभिवादन करणारे मनोज जरांगे पाटील व पुढे तरुणांचा जल्लोष, हाती भगवे झेंडे अशा उत्साही वातावरणात मुंबईकडे निघालेल्या मराठा आरक्षण पदयात्रेचा मीडसांगवी (ता. पाथर्डी) येथून अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश झाला. जरांगे पाटील यांच्या कर्तृत्वाची गाणी वाजविणारा डीजे, फुलांची उधळण, रांगोळ्या असे चित्र सर्वत्र दिसत होते. पदयात्रेतील वाहने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती.
मुंबईमध्ये गेल्यानंतर काही दगाफटका झाला, गोळ्या झाडल्या, तरी एकही इंच मागे हटणार नाही. काही गडबड झाली, तर आपापल्या ठिकाणी फक्त रस्त्यावर येऊन उभे राहा, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. आगसखांड (ता.पाथर्डी) येथे पदयात्रेदरम्यान ते बोलत होते
मराठा आरक्षणासाठी २६ जानेवारीपासून मुंबईत सुरू होणारे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच, ओबीसी व इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जाहिरात