सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात कामाला गती, डिसेंबरपर्यंत होणार काम पूर्ण…
रत्नागिरी : प्रतिनिधी – मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील बारा वर्षापासून रखडले आहे. बारा वर्षात महामार्गाच्या कामावर नियोजित खर्चापेक्षा दुप्पट खर्च झाल्याचे समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे. महामार्ग काम रखडले असले तरी जेव्हापासून ना. रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम मंत्री म्हणून पदभार सांभाळायला सुरुवात केली तेव्हापासून महामार्ग कामाला गती मिळाली आहे. सातत्याने विरोधक या महामार्ग कामावर टीका करत असताना ना. चव्हाण मात्र स्वतः जातीने लक्ष घालून कामाला गती कशी मिळेल, यावर मार्ग काढत आहेत.
मुंबई-गोवा ४४०किमी महामार्गावरील ११२किमी मार्गाचे अद्याप चारपदरीकरण बाकी असून, महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी यापूर्वी डिसेंबरची मुदत आहे. जितेंद्र घाडगे यांनी आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गासाठी केंद्र सरकार आणि राज्य बांधकाम विभागाने आत्तापर्यंत ७३००कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये महामार्गाचे चौपदरीकरणासह बोगदे, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि बाह्य रस्ते यांचा समावेश आहे.
मुंबई- गोवा महामार्गाच्या कामासाठी ते ३५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पनवेल ते इंदापूर पर्यंतचा ८४ किमीचा मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने बांधण्यात आला. त्यानंतर उरलेल्या ३५५किमी मार्गाचे काम राज्य बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. यासाठी सुरुवातीला ९००कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, दरम्यान, सध्या या मार्गासाठी आत्तापर्यंत १२००कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्याप २८ किमी मार्गाचे रुंदीकरणाचे काम शिल्लक आहे. तसेच, राज्य बांधकाम विभागाकडे असलेल्या कामासाठी आत्तापर्यंत ६१००कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, अद्याप ८४ किमी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम शिल्लक आहे. मुंबई- गोवा महामार्गावर २०१०पासून २५०० जणांचा मृत्यू झाला आहे, असे घाडगे यांनी मिळलेल्या माहितीतून उघड झाले आहे.
महामार्ग काम रखडले असले तरी जेव्हापासून ना. रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम मंत्री म्हणून पदभार सांभाळायला सुरुवात केली तेव्हापासून महामार्ग कामाला गती मिळाली आहे. सातत्याने विरोधक या महामार्ग कामावर टीका करत असताना ना. चव्हाण मात्र स्वतः जातीने लक्ष घालून कामाला गती कशी मिळेल, यावर मार्ग काढत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या ६० वर्षात पहिल्यांदा कोकणच्या महामार्गावर बांधकाम मंत्री अनेकदा पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ना. चव्हाण या महामार्गाकडे लक्ष घालत असल्याने सध्या कामाला गती तर मिळाली आहे, परंतु चाकरमानी कोकणात येताना प्रवास सुखकर होणार आहे. काही भागात एक बाजू पूर्ण झाली असून बऱ्याच भागात चारपदरी काम पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती बांधकाम विभागाकडून मिळाली आहे.