कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. केंद्रानेही यासाठी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-नायगाव-जूचंद्र असा नवा बायपास बांधून बोरीवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे. या कामाला पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथील मेळाव्यात ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेबरोबरच हार्बर मार्ग बोरीवीपर्यंत जोडणात येण्याच्या कामांना आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे.
उत्तर-मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांनी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांच्याकडे बोरीवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे. तसंच, गोरेगावचा हार्बर रेल्वेमार्ग बोरीवलीपर्यंत जोडण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार, या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे. हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत आणण्यासाठी 826 कोटी रुपयांची तर नायगाव-जुचंद्र बायपाससाठी 176 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या हार्बर रेल्वे पश्चिम मार्गावर गोरेगावपर्यंतच आहे. या मार्गाचा विस्तार करण्याचा रेल्वेचा मानस आहे. अनेकदा प्रवाशांनीही या हार्बर मार्ग बोरीवलीपर्यंत विस्तार केला जावा, अशी मागणी केली होती. त्यामुळं लवकरच या मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळं पनवेलवरुन बोरीवलीपर्यंचा प्रवास सोप्पा होणार आहे. कोकणपर्यंत रेल्वे नेण्यात वसई येथे बायपासचा अडथळा आहे. तो दूर करण्यासाठी 176 कोटी मंजूर केले आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गात असलेले पुढील अडथळे गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत पूर्ण होतील, अशी शक्यता रेल्वेमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे. हार्बर सेवा बोरीवलीपर्यंत आणणे ही आत्ताच्या घडीला येथील ज्वलंत मागणी आहे. रेल्वे मेट्रोला जोडली तर खूप फरक पडेल. बोरीवली आणि मालाड ही दोन स्टेशन स्मार्ट होत आहेत. पुढच्या टप्प्यात दहिसर आणि कांदिवलीला स्मार्ट स्टेशन बनवण्यात यावे, अशी मागणी पीयूष गोयल यांनी केली आहे.