भारताच्या फिरकीसमोर इंग्लंड हतबल, रोहित-यशस्वीने झळकावले अर्धशतक, पहिल्या दिवशी यजमानांचे वर्चस्व…

Spread the love

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या १ बाद १३५ धावा होती. त्यामुळे टीम इंडिया इंग्लंडपेक्षा ८३ धावांनी मागे आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल नाबाद परतले.

पहिल्या दिवशी भारतीय संघ ८३ धावांनी पिछाडीवर…

भारत आणि इंग्लंड संघातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला भारतीय फिरकीपटूंनी २१८ धावांवर गुंडाळले. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या दिवसखेर १ बाद १३५ धावा केल्या असून ८३ धावांनी पिछाडीवर आहे.

भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची दमछाक –

कर्णधार रोहित शर्मा ५२ धावांवर नाबाद असून शुबमन गिल २६ धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये ३१ धावांची भागीदारी झाली आहे. भारतीय संघाला एकमेव धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. तो ५८ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. त्याला शोएब बशीरने यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी यष्टिचित केले. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने १०० वा कसोटी खेळताना चार विकेट घेतल्या. इंग्लंडकडून झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. इंग्लंडच्या सर्व १० विकेट्स भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या.

रोहित-यशस्वीची पहिल्या विकेट्साठी १०४ धावांची भागीदारी –

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ २१८ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वालने ५८ चेंडूत ५७ धावांची तुफानी खेळी केली. शोएब बशीरच्या चेंडूवर बेन फॉक्सने यशस्वी जैस्वालला यष्टिचित केले. पण रोहित शर्माने एका बाजूने फटकेबाजी सुरुच ठेवली.

रोहित शर्माचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५० षटकार पूर्ण –

रोहित शर्मापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी भारतीय कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये १००० धावा केल्या होत्या. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांनी ही कामगिरी केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त ६ कर्णधारांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये १००० धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित शर्माने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५० षटकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page