ठाणे :प्रतिनिधी (निलेश घाग) दिवा-नवीन पाईपलाईनच्या लोकार्पणानंतर दिव्यातील विविध भागात भीषण पाणीटंचाई आहे.भर पावसात असणाऱ्या या पाणीटंचाईला पालिका प्रशासन आणि मनमानी करणारे शिवसेनेचे स्थानिक नेते जबाबदार आहेत. दिव्यात असणाऱ्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी दिवावासीयांच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर मडके फोडो आंदोलन करणार असल्याचे भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी जाहीर केले आहे.
जून मध्ये दिवा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने मुख्य जलवाहिनीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.मात्र या लोकार्पण सोहळ्यानंतरच दिवा शहरातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये दोन ते तीन दिवस आड करून पाणी येते.काही भागांना पाणी मिळत नाही. भर पावसात दिव्यात टँकर द्वारे नागरिकांना पाणी घ्यावे लागते.टँकर लॉबी चालावी म्हणून दिव्यातील काही स्थानिक शिवसेना नेत्यांकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात आहे का? असा सवाल ही भाजपचे रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला आहे. दिवा शहरातील नागरिकांना पाणी बिल भरूनही पाणी मिळत नाही याकडे रोहिदास मुंडे यांनी लक्ष वेधले आहे.भर पावसात दिवा शहरात भीषण पाणी टंचाई असून शहरातील नागरिक पाण्यासाठी वन वन भटकताना दिसतात.नागरिकांचा प्रत्येक सुट्टीचा रविवार हा पाणी लाईन चेक करणे आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जातो. पावसाळ्यात अशी परिस्थिती असेल तर अन्य दिवसात येथील नागरिकांना किती यातना होत असतील असा प्रश्न रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे. पालिका प्रशासनाला व पालिका प्रशासन ज्यांच्या इशाऱ्यावर चालतं त्यांना दिव्यातील जनतेच्या पाणी प्रश्नाशी काही देणं घेणं नाही.नागरिकांनी फक्त यांच्या बंगल्यांवर हजेरी लावायची आणि पाण्यासाठी याचना करायची अशीच यांची भावना असून नागरिकांना पाणी दिल्यास नागरिक पुन्हा आपल्या बंगल्यावर येणार नाहीत, या हेतूने येथील तथाकथित कार्यसम्राट नेते दिव्यातील पाणी प्रश्न सोडवत नाहीत असा आरोपच रोहिदास मुंडे यांनी केला आहे.महापालिका प्रशासन दिव्यातील पाणी समस्या सोडवण्यात पूर्णतः अपयशी ठरले असून या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर मडके फोडो आंदोलन करणार असल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.दिव्यातील जनतेच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे रोहिदास मुंडे यांनी सांगितले आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात