
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी शपथविधी सोहळ्याला उपस्थित
हैदराबाद- तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंथ रेड्डी विराजमान झाले आहेत. तेलंगणातील हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमात काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल टी सुंदरराजन यांनी काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तेलंगणाच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यासह नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन रेवंथ रेड्डी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज गुरुवारी सकाळी हैदराबादला पोहोचले. हैदराबाद विमानतळावर या सर्वांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.


तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणाऱ्या रेवंथ रेड्डी यांना त्यांचे समर्थक ‘टायगर रेवंत’ असेही म्हणतात. रेवंथ रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री ठरलेत. रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने या निवडणुकीत बीआरएसच्या वर्चस्वाला धक्का देत तेलंगणाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात सत्ता मिळवली. तेलंगणात विधानसभेच्या 90 जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 64 जागा मिळाल्या आहेत. तर 2014 पासून सातत्याने सत्तेत असलेली बीआरएस 39 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयानंतर रेवंथ रेड्डी यांचेच नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर होते.