
रत्नागिरी- रनपार येथील समुद्रात उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांचा जलविहार त्यांच्याच जीवावर बेतता बेतता वाचला. रनपार समुद्रात मंगळवारी दुपारी १६ तरुणांना फिरण्यासाठी घेऊन गेलेली नौका दुपारच्या सुमारास समुद्रात उलटली. या बोटीतील सर्वाचा जीव धोक्यात आला होता मात्र, *Finolex* कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बुडालेल्या सर्व जणांचे जीव वाचवण्यात यश आले.
मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजता पावस येथून ‘सरस्वती’ नावाची एक खासगी बोट १६ तरुणांना घेऊन समुद्र सफरीसाठी निघाली होती. फिनोलेक्स केमिकल जेटीजवळ आल्यानंतर अचानक समुद्राला उधाण आले. मोठमोठ्या उसळणाऱ्या लाटांमुळे
बोटीतील हास्य अचानक किंकाळ्यांमध्ये बदलले. समुद्र खवळलेला होता, वाऱ्याचा जोर वाढला आणि बोटीत क्षमतेपेक्षा अधिक जण असल्याने ‘सरस्वती’ बोट एका क्षणात पलटी झाली. बोटीतले सर्व १६ तरुण समुद्रात पडले आणि क्षणात जीव धोक्यात आला.
या प्रसंगाचे साक्षीदार ठरले फिनोलेक्स कंपनीचे कर्मचारी. ‘अल फरदिन’ नावाच्या बोटीवर कार्यरत असलेले तांडेल फरीद आणि ‘सिल्वर सन’ पायलट बोटीवर ड्युटीवर असलेले HC मुजावर, MSFचे जवान विजय वाघब्रे, तसेच अपूर्व जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतला. प्रसंगावधान आणि धाडस दाखवत या चौघांनी एकामागोमाग एक १६ तरुणांना बुडताना वाचवले. एकेक करत सर्वांना बाहेर काढत त्यांनी खऱ्या अर्थाने देवदूतांची भूमिका बजावली.
बचावलेल्या तरुणांमध्ये केतन आडविलकर, मयुरेश वरवटकर, महंत खडपे, ध्यानेश्वर डोळेकर, आर्यन वरवटकर, श्रेयस वरवटकर, कुणाल डोरलेकर, स्वानंद वरवटकर, अथर्व नाचणकर, साई वाडेकर, सुमित बोरकर, गौरंग सुर्वे, ओम सुर्वे, अथर्व सुर्वे, रुद्र सुर्वे यांचा समावेश होता. सर्व तरुण सुखरूप बाहेर पडल्यावर त्यांना पूर्णगड पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान, ‘सरस्वती’ बोट ही पूर्णतः समुद्रात बुडाली असून ती जलसमाधीला गेली आहे.