राजापूर (प्रतिनिधी )- तो कालखंड १९९५ चा होता. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू व्हायची होती. तथापी जाहीर सभांना जोरदार सुरुवात झाली होती. त्यापैकीच एक सभा राजापूर हायस्कूलच्या भव्य पटांगणावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सुरू होती. बाळासाहेबांनी आपल्या भाषणादरम्यान एका ज्येष्ठ नेत्याकडे बोट दाखवीत म्हणाले यांच्या पिकलेल्या दाढी मिशांकडे पाहू नका.. एक योद्धा म्हणून यांचा दबदबदबा आहे. तुमच्या सेवेसाठी हे सदैव तत्पर असतील. आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्हाला उमेदवार म्हणून हे पसंद आहेत का शिवसेनाप्रमुखांच्या या आवाहनाला उपस्थित असलेल्या लाखाच्या जनसमुदायाने एक मुखाने होकार देत टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट केला. आणि राजापूरचे आसमंत दणाणून गेले. त्यानंतर काही वेळ टाळ्याआणि टाळ्याच वाजत होत्या.
शिवसेना प्रमुखांच्या राजापूर मध्ये झालेल्या न भूतो न भविष्यती अशा विराट सभेत विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजापूरच्या उमेदवाराची घोषणा झाली होती.
आप्पा उर्फ विजयराव साळवी, शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे रांगडे नेतृत्व, वयाने साठी ओलांडली असली तरी तरुणाईला लाजवेल असाच परफॉर्मन्स, कोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना रुजावी म्हणून ज्या नेते मंडळींनी खस्ता खाल्ल्या त्या सर्वांचे केंद्रबिंदू…अशा विजयराव साळवी यांना विधानसभेसाठी उमेदवार म्हणून खुद्द शिवसेना प्रमुखांनी राजापुरात येऊन त्यांच्या नावाची घोषणा केली होती.
त्यानंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये प्रचंड उत्साह संचारला. यावेळी राजापूरचा गड युती नक्की जिंकेल अशी खात्री कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली.नव्वदीच्या कालखंडात झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात सात पैकी सहा विधानसभा मतदार संघ जिंकून शिवसेना भाजप युतीने कॉँग्रेसला कोकणात जोरदार तडाखा दिला होता. मात्र राजापूर, लांजा विधानसभा मतदारसंघात युतीला आपला करीष्मा दाखविता आला नव्हता. कारण या मतदार संघात कॉँग्रेस भक्कम असल्याने युतीचे काही चालले नव्हते. मात्र तरी देखील युतीने विशेषतः शिवसेनेमध्ये राजापूरचा गड कोणत्याही परिस्थितीत मिळवायचाच या ध्येयाने जोरदार तयारी सुरू होती. सन १९९५ साली देशासह राज्यात मोठया घडामोडी झाल्या होत्या. बाबरीचे पतन झाले होते. हिंदुत्वाचा मुद्दा जोमाने पुढे आला होता. शहरी भागापुरते अस्तित्व असलेल्या शिवसेनेच्या कार्य कक्षांचा विस्तार होऊ लागला होता. राज्याच्या ग्रामीण भागात शिवसेना विस्तारत होती. त्याचे परिणाम सन १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीने जोरदार मुसंडी मारली होती.सन १९९५ साली विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. निवडणुकीची घोषणा देखील झाली नव्हती. मात्र युतीच्या नेत्याने महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद लाभत होता. आणि अपेक्षेप्रमाणे सन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आणि राज्यात प्रथमच शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले होते. युतीच्या यशात अपेक्षेप्रमाणे कोकणचा वाटा मोलाचा होता. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सातही जागा जिंकून युतीने दिमाखात विधिमंडळात प्रवेश केला होता. त्यामध्ये राजापुरातून आप्पा उर्फ विजयराव साळवी यांचाही आमदार म्हणून समावेश होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री ल.र. हातणकर यांचा तबबल ३७ हजार मतांनी पराभव करीत शिवसेनेने राजापूरचा गड जिंकला होता. विजयराव साळवी आमदार झाले होते. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघ प्रथमच युतीने जिंकला होता .शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जिल्ह्यात जोरदार काम करणाऱ्या आप्पा उर्फ विजयराव साळवी यांची विधिमंडळातील दुसरी इनिंग सुरू झाली होती. शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ विधानसभेत पोहोचली होती. एक ज्येष्ठ आणि बुजुर्ग नेते असलेल्या आमदार आप्पा साळवी यांच्याबद्दल बद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड आदर होता. युती शासन काळात एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आप्पा साळवी यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला होता. वाड्या वस्त्यांवर.. घरोघरी जाऊन ते जनतेशी संवाद साधत असत.
कोणाच्याही घरी गेल्यावर तेथे खुर्चीवर न बसता जमिनीवर चटईवर किंवा घोंगडीवर बसून ते जनतेशी संवाद साधायचे. एवढा साधेपणा त्यांच्यामध्ये होतो. आपल्या पाच वर्षाच्या आमदार पदाच्या कार्यकालात मतदारसंघात त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला.सत्तेच्या माध्यमातून विकास कामे केली. हे करीत असताना आपल्या चारीत्राला कुठेही डाग लागणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.आपले चारित्र्य स्वच्छ ठेवले.आप्पा आमदार होते. तरी देखील आप्पा या नावानेच त्यांची ओळख होती.लोक आदराने त्याच नावाने त्यांना साद घालायचे. आणि आप्पा देखील आपुलकीने आणि साधेपणाने लोकांची वागायचे. व्यक्ती लहान असो अगर मोठा असो प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून ते आदबीने बोलायचे.
आमदार पदाचा कार्यकाल संपल्यानंतरही त्यांचा जनतेशी संपर्क सुरू असायचा. अलीकडची काही वर्षे वृद्धापकाळामुळे त्यांचा संपर्क कमी झाला होता. अखेर सोमवारी वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. शिवसेनाप्रमुखांचा एक सच्चा सहकारी अनंतात विलीन झाला. दिवंगत आमदार आप्पा उर्फ विजयराव साळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..