देवरुखच्या स्वामी समर्थ मठ परिसरात अलोट गर्दीत अंत्यसंस्कार
देवरुख- देवरुख येथे श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करणारे रेकी विद्यानिकेतन या नावाने गेली २५ पेक्षा अधिक वर्ष भारतात तसेच परदेशातही लोकांना आध्यात्मिक मार्गाची शिकवण देणारे सदाचाराच्या जीवनपद्धतीचा अंगीकार करायला लावणारे व निरामय जीवन प्राप्त करून देणारे सद्गुरु अजित तेलंग(७१) यांचे रविवारी रात्री निधन झाले.
सोमवारी संध्याकाळी स्वामी समर्थ मठाच्या परिसरात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उच्च विद्याविभूषित असणारे अजित तेलंग यांनी सुरुवातीला अनेक कॉर्पोरेट मध्ये नोकरी केली. त्यानंतर स्वतःची मार्केट रिसर्च कंपनी स्थापन केली. तसेच सॉफ्टवेअर कंपन्या देखील यशस्वीरित्या चालवल्या. व्यवसायात अग्रगण्य कामगिरी करत असताना पंचवीस वर्षापूर्वी श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून अध्यात्मिक मार्गावर चालायचे ठरवले.
शिवसंहितेमध्ये वर्णन केलेल्या तसेच विवेकानंदांनी आपल्या राजयोग मध्ये सांगितलेल्या स्पंदन शास्त्र या विद्येचे मीकाउ उसुई या जापनीज संताने पुनर्शोधन करून रेकी या नावाने प्रसिद्ध केलेल्या विद्येचा प्रचार आणि प्रसार करण्यात तेलंग यांनी आपली आपले पूर्ण आयुष्य खर्च केले. जगभरात त्यांचे ४० हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत. सदाचाराची जीवन पद्धती अवलंबण्याचा मार्ग आपल्या अनेक विद्यार्थ्यांना आखून देऊन तेलंग यांनी त्यांना रोगमुक्त तर केलंच परंतु आनंददायी आणि निरामय आयुष्याकडे त्यांची वाटचाल केली.
सन २००४ पासून त्यांनी नवीन पिढीच्या मध्ये झालेल्या बदलावर संशोधन केले व या नवीन पिढीसाठी शिबिरांची निर्मिती केली तसेच सुजाण पालकत्व याचे वर्ग देखील भारतभर अनेक ठिकाणी घेतले.
भारत मंत्रालयाच्या आयुष विभागातर्फे रेकी विद्यानिकेतनने ‘आयुष्यमान भारत’ या प्रकल्प अंतर्गत एक हजाराहून अधिक डॉक्टर्सना देखील रेकीची दीक्षा दिली. गुजरात येथील आंतरराष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ तसेच हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांसाठी देखील सरांनी प्रशिक्षण वर्ग घेतले.
भारतात १६ ठिकाणी व अमेरिकेत आठ ठिकाणी रेकी प्रशिक्षणाची केंद्र स्थापित केली त्यांनी अध्यात्मिक विषयावर अनेक पुस्तके देखील लिहिली. रविवारी देखील दोन दिवसाचा सेमिनार पूर्ण झाल्यानंतर रात्री तेलंग यांनी आपला देह ठेवला व त्यांच्याच एका पुस्तकाच्या शीर्षकानुसार या जीवनाचा महायज्ञ साजरा केला.