१७ नोव्हेंबर/रत्नागिरी: जिल्ह्यात राबविण्यात येत असणाऱ्या विविध योजना, विविध प्रकल्प आणि जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी देण्यात आलेला निधी, त्यावर करण्यात आलेला खर्च आदीबाबतचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज विविध विभागांच्या बैठकीच्या माध्यमातून घेतला.
यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी एम. डी. बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुजित वंजारे आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्राणी संग्रहालय उभारण्या संदर्भातील बैठकीत श्री. सामंत म्हणाले, मोजणीचे काम तात्काळ पूर्ण करा. भूसंपादनाची प्रक्रिया १ डिसेंबरपर्यंत पूर्ण करुन तेथील कामाला सुरुवात करा. मालगुंड येथे प्राणी संग्रहालय उभारण्याकरिता थेट खरेदीने भू संपादन करण्याकरिता ३ कोटी ९५ लाख इतका निधी तहसीलदार रत्नागिरी यांना वितरित करण्यात आल्याचे तसेच संरक्षक भिंतीकरिता एमआयडीसीकडून ५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सिंधुरत्न समृध्द योजनेतून १० कोटी रुपये इतका निधी देण्याचे आणि उर्वरित खर्च एमआयडीसी करेल, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. प्राणी संग्रहालयाबाबतचा एमआयडीसी, जिल्हा परिषद आणि वन विभाग यांच्यात सामंजस्य करार झाल्याची माहिती त्यांनी दिली.
दाभोळ खाडी प्रदूषण बाबतच्या बैठकीत आढावा घेताना पालकमंत्री श्री. सामंत यांनी खाडीकडे जाणाऱ्या नाल्याची रुंदी व खोली वाढविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करा. नादुरुस्त पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी निधी दिल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय, भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई आदी विषयांचाही आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला.
नमो ११ सुत्री कार्यक्रम आढावा बैठकीमध्ये महिलांना शासकीय नियोजनाच्या लाभांतर्गत २ हजार ४४३ बचतगटांच्या सीआरपीएस यांना शासनामार्फत मोबाईल वितरण देण्यासाठी ३ कोटीचा निधी देण्यात आला असून त्याचे वितरण १५ दिवसात होणार असल्याचे ते म्हणाले. नमो कामगार कल्याण अभियान, नमो शेततळे अभियान, नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियान, नमो ग्राम सचिवालय अभियान, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, नमो दिव्यांग शक्ती अभियान, नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान, नमो शहर सौंदर्यीकरण अभियान, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान, नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानांचा आढावाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी घेतला.
१३ कलमी फ्लॅगशिप कार्यक्रम, महिला व बालविकास योजना जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, जिल्हा अल्पसंख्याक विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच नगरपालिका विकास कामांचा आढावाही घेतला.