२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाची विजयी घौडदौड चालूच आहे. आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विजयानंतर पक्षानं हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपली पकड आणखी मजबूत केली.
नवी दिल्ली – राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून, तेलंगणात कॉंग्रेसनं बाजी मारली.
स्वबळावर किती राज्यात सत्ता….
आता या तीन राज्यांमध्ये सरकार बनवताच भारतीय जनता पार्टी १२ राज्यांमध्ये स्वबळावर सत्तेत येईल. तर दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस, पराभवानंतर केवळ ३ राज्यांमध्ये स्वबळावर सत्तेत असेल. तिसऱ्या क्रमांकावर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पक्ष आहे. तो दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आहे.
ही भाजपशासित राज्यं..
आजच्या निकालापूर्वी, केंद्रात सत्ता गाजवणारा भाजपा उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये सत्तेत होता. आता भाजपानं राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेसकडून हिसकावून घेतलं. याशिवाय भाजपा महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. अशाप्रकारे देशातील एकूण १६ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली आहे.
काँग्रेस या राज्यांपुरती मर्यादित…
आजच्या निकालानंतरकाँग्रेस आता केवळ कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये स्वबळावर सत्तेत असेल. याशिवाय पक्ष बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. तसेच ते तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमकेचे सहयोगी आहेत. मात्र ते सत्तेत सहभागी नाहीत. अशाप्रकारे काँग्रेस देशात एकूण ५ राज्यांमध्ये सत्तेत आहे.
पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका….
सध्या भारतात भाजपा, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (BSP), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPI (M), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP), आणि आम आदमी पार्टी हे सहा राष्ट्रीय पक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीची पुढील फेरी २०२४ मध्ये होईल. तेव्हा सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये निवडणुका होतील. यासोबतच जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका प्रलंबित आहेत. यासोबतच पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुकाही होणार आहेत.