हरयाणात भाजपची मुसंडी! काँग्रेसला नेमका कशाचा फटका बसला? वाचा पराभवाची ५ कारणे..

Spread the love

राहुल गांधी यांनी डझनभर सभा घेतल्या, विजय संकल्प यात्रा काढल्या मात्र तरीही सुरुवातीला जोरदार आघाडी घेतलेल्या काँग्रेसचा पराभव नेमका का झाला? काय आहेत नेमकी कारणे? वाचा सविस्तर…

हरियाणा हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काहीसे अनपेक्षित लागले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसचा एकतर्फी विजय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सुरुवातीच्या ट्रेंड्सनुसार काँग्रेस आघाडी घेताना दिसत होती. मात्र नंतर चित्र पुर्ण पालटलं आणि भाजपनं जोरदार मुसंडी मारली. ताज्या आकडेवाडीनुसार भाजप ४९ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ३५ जागांवर अडकली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा संपूर्ण निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करत होते आणि राहुल गांधी यांनी डझनभर सभा, विजय संकल्प यात्रा काढल्या होत्या. याशिवाय राज्यात शेतकरी, जवान आणि पैलवानांच्या नाराजीचे कथानक काँग्रेसकडून चालवले जात होते. त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी होता.

सैन्य भरतीत अग्निवीर योजना लागू करण्यास तीव्र विरोध झाला होता आणि निवडणुकीतही हा मुद्दा महत्वाचा ठरेल, असे काँग्रेसने म्हटले होते. याशिवाय दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन आणि त्यापूर्वी सुमारे दीड वर्ष चाललेले शेतकरी आंदोलनही काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे होती. मात्र हरयाणात सर्व अंदाज फोल ठरत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता राखली आहे. तर काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. हरयाणा निवडणुकीच्या बदललेल्या कलांमागे ५ कारणे आहेत, ज्यामुळे कमकुवत दिसूनही भाजप मजबूत राहिला आणि सर्व प्रयत्न करूनही काँग्रेसला कमाल करता आली नाही, असे जाणकारांचे मत आहे.

काँग्रेसच्या पराभवाची पाच कारणे-

▪️हरयाणा विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी १७ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. या जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये चढाओढ आहे. तिसऱ्या कोणत्याही पक्षासाठी येथे काहीच संधी दिसत नाही. दुपारी सव्वाबारा वाजेपर्यंत काँग्रेस १७ पैकी ९ जागांवर तर भाजपचे उमेदवार ८ जागांवर आघाडीवर होते. भाजपसाठी हा मोठा आकडा आहे कारण मागच्या वेळी केवळ ५ जागा जिंकल्या होत्या. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने गेल्या वेळी चार राखीव जागा जिंकल्या होत्या, तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती. यावेळी जेजेपी एकाही जागेवर चांगली कामगिरी करताना दिसत नाही.

▪️हुडा विरुद्ध कुमारी शैलजा हे प्रकरण काँग्रेसमध्ये चांगलेच गाजले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही दोन्ही नेत्यांमधील संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आणि दोघेही रॅलीत हात उंचावताना दिसून आले. काँग्रेसचे म्हणणे होते की, या दोघांचे संबंध वाईट नाहीत, पण कुमारी शैलजा आणि हुडा या दोघेही स्वतंत्रपणे मुख्यमंत्रिपदाचा दावा करत राहिले. इतकंच नाही तर कुमारी शैलजा यांनी एका मुलाखतीत असंही म्हटलं होतं की, मी त्यांच्याशी कधी बोललो ते आठवत नाही. या दोघांमधील अशा उघड संघर्षामुळे पक्षाचे सातत्याने नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे.

▪️ काँग्रेसबद्दल असेही म्हटले जात आहे की, त्यांनी जाट नेतृत्व पुढे केले आहे. भूपिंदर सिंह हुड्डा यांच्याकडे कमांड होती आणि त्यांच्या सांगण्यावरून ७२ जणांना तिकिटे देण्यात आल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारे त्यांनी कमांड घेतल्याने जाट लॉबीच्या वर्चस्वाचा संदेश गेला. यामुळे अहिरवाल पट्ट्यातील यादव, ब्राह्मण आणि इतर अनेक समाज भाजपशी जोडले गेले. याशिवाय करनाल, कुरुक्षेत्र, हिसार सारख्या भागात पंजाबी आणि इतर समाज भाजपकडे आकृष्ट झाला.

▪️भाजपने ६ महिन्यांपूर्वी हरयाणाचा मुख्यमंत्री बदलला. मनोहरलाल खट्टर यांना हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले. ते केंद्रात मंत्री झाले आणि नायबसिंग सैनी यांना राज्याची सुत्रे सोपवली. खट्टर यांना विधानसभेच्या प्रचारापासून दूर ठेवण्यात आले. अशा प्रकारे भाजपने खट्टर यांच्याबाबत असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. नव्या चेहऱ्याने नव्या अपेक्षा निर्माण केल्या आणि त्या त्यांच्या बाजूने गेल्या.

▪️एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे काँग्रेसचे नेते अतिउत्साहात होते, तर भाजप सामाजिक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत होता. गुरुग्राममध्ये प्रथमच ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली, तर महेंद्रगडमध्ये यादव यांना संधी देण्यात आली. याशिवाय सैनी, गुर्जर, यादव समाजात अनेक बैठका झाल्या. अशा प्रकारे बिगर जाट ओबीसी समाजात भाजप एकवटला असून त्याचे फायदेही दिसू लागले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page