
*मुंबई-* राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढील तीन ते पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. कोकण, पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार आणि अहिल्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिमुसळधार, तसेच सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात पुढील पाच दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राज्यात रविवारी दाखल झालेल्या मान्सूनने अवघ्या 24 तासांत मुंबईपर्यंत धडक मारली असून, पुढील तीन ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली आहे. केरळ आणि तळकोकणात वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने सोमवारी पुणे, मुंबई आणि सोलापूर या भागांतही आपला प्रभाव दाखवला आहे. मराठवाडा आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रात फारसा बदल अपेक्षित नसल्याने पुढील काही दिवस कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

रेड अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांसह सातारा घाटमाथा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
ऑरेंज अलर्ट: रायगड, पुणे जिल्ह्यांचा घाटमाथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
येलो अलर्ट: ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा. तसेच उर्वरित राज्यात येलो अलर्ट दिला आहे.
अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच अहिल्यानगर, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवसांत तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात येत्या पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.