रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा आज सुरुवात. आता शिधापत्रिका एका क्लिकवर…

Spread the love

रत्नागिरी, दि. 21 मे 2024: जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका सुविधा सुरू करण्यात आली आहे. खेडशी येथील विकास पवार यांना जिल्ह्यातील पहिली ऑनलाईन पोर्टलद्वारे ई-शिधापत्रिका वितरण आज करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.

पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे कार्यक्षम वितरण होण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक पाऊल पुढे आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह, रहिवासी आता सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी न घेता त्यांच्या रेशन कार्डसाठी सोयीस्करपणे अर्ज करू शकतात आणि प्राप्त करून घेवू शकतात.

ई-शिधापत्रिका मध्ये विशिष्ठ क्यू आर कोड दिला आहे. दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांची विशेष नोंद यामध्ये घेण्यात येणार आहे.

शिधापत्रिकामध्ये नाव, कुटुंबाचा तपशील, पत्ता, रा.धा. दु./ रॉकेल चालकाचा पत्ता, युनिट यासह रा.अ. सु. अ. २०१३ मधील तरतुदीनुसार देय धान्य बाबत माहिती नमूद केली आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडील दि. २१ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ई-शिधापत्रिका साठी सेवानिहाय शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अन्त्योदय अथवा केशरी शिधापत्रिका करिता अनुक्रमे २५ व ५० रु. व शुभ्र शिधापत्रिका करिता १०० रु. ऑनलाईन शुल्क आहे.

अर्जदार यांनी शिधापत्रिकासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून, योजनेच्या प्रकारानुसार सेवाशुल्क भरून ऑनलाइन ई-शिधापत्रिका प्राप्त करून घेता येईल. त्यानंतर ई-शिधापत्रिका डाउनलोड करण्याकरिता निःशुल्क सेवा देण्यात येईल.

जिल्हा पुरवठा कार्यालयातील पुरवठा निरीक्षक ऋषिकेश जाधव यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पहिले. याकरिता प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी रिद्धी गोरे यांनी मार्गदर्शन केले. पुरवठा निरीक्षक मनोज पवार व तांत्रिक सहायक सारिका साळवी हे उपस्थित होते.

अधिक माहिती व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://rcms.mahafood.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा नजीकच्या पुरवठा विभागाशी संपर्क करा, असे अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रजपूत यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page