देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात अनेक नेत्यांनी देखील मोठा सहभाग दर्शवला असून सकाळपासूनच उमेदवार थेट मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला हक्क बजावताना दिसत आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यात आज (13 मे) देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि औरंगाबाद या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. तर आज सकाळपासूनच मतदारांची मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. तसंच अनेक राजकीय नेतेही आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावत असल्याचं बघायला मिळतंय.
सुजय विखे पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क :
बहुचर्चेत असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, डॉ सुजय विखे पाटील यांनी लोणी बुद्रुक येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक व माध्यमिक महाविद्यालयात जावून आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासह त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील, आई शालिनीताई विखे पाटील, पत्नी धनश्री विखे पाटील उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात यांनीही केलं मतदान :
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील आपल्या जोर्वे गावातील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी कांचनताई थोरात आणि मुलगी डॉ. जयश्री थोरात या देखील उपस्थित होत्या. तसंच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे , माजी आमदार डॉ. सुधीर तांबे , संगमनेर नगरपालिकेचा नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही संगमनेर येथील सह्याद्री विद्यालय येथील मतदान केंद्रावर जावून आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय.
सदाशिव लोखंडे सहपत्नीक केलं मतदान :
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या पत्नी नंदा लोखंडे यांनी त्यांचं औक्षण केलं. औक्षनानंतर लोखंडे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील उंबर गावातील कालभैरव मंदिरात जावून सहपत्नीक दर्शन घेतलं. त्यानंतर शिर्डीत येवून साईबाबांच्या मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर लोखंडे यांनी सहपत्नीक शिर्डीतील आदर्श माध्यमिक विद्यालय केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. तसंच येथील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सपत्नीक शिर्डीतील साईनाथ माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावर जावून मतदान केलं. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनीही आपल्या अकोले गावी मतदानाचा हक्क बजावला.
रवींद्र धंगेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क :
पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकुटुंब रविवार पेठ येथील कमला नेहरू महापालिका शाळा येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
रावसाहेब दानवेंनी सहकुटुंब केलं मतदान :
जालना लोकसभेचे भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेत दानवेंनी मतदान केलंय. यावेळी बोलताना राज्यात महायुतीला 45, तर देशभरात 400 पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील दिग्गज नेत्यांनी केलं मतदान :
औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास पैठण तालुक्यातील पाचोड येथे मतदान केलं. तर डॉ. कल्याण काळे यांनी पिसादेवी या गावात सहपत्निक आपला मतदानाचा हक्क बजावला. तसंच एम.आय.एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गोदावरी शाळेत, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजबनगर महानगरपालिका शाळा, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी औरंगपुरा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी समता नगर येथे आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी खडकेश्वर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.