३० मार्च/रत्नागिरी : रत्नागिरी शहर भाजपातर्फे शनिवारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रंगपंचमी साजरी केली. या वेळी त्यांचे कुटुंबियसुद्धा आवर्जून उपस्थित होते. भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयात नैसर्गिक रंग वापरून रंगोत्सव साजरा करण्यात आला. तत्पूर्वी सर्वांनी ग्रामदैवत श्री देव भैरीचे दर्शन घेतले. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत आणि भाजपा अब की बार ४०० पार जागा जिंकू दे, असा संकल्प करण्यात आला.
रंगपंचमी साजरी झाल्यानंतर याप्रसंगी माजी आमदार, लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी सांगितले की, आठवडाभर शिमगोत्सव कोकणात साजरा होतोय. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आज भाजपा शहराच्या वतीने नैसर्गिक रंगपंचमीचा सण साजरा केला आणि ४ जूनला आम्ही विजयाचा गुलाल उधळणार आहोत. विजयाचा संकल्प केला आहे. भाजपा, शिवेसना, राष्ट्रवादी कॉंग्रेस गट, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या सर्वांनी संकल्प केला आहे. खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर, दिवंगत खासदार प्रेमजीभाई आसर यांच्यानंतर पुन्हा एकदा कमळाच्या निशाणीवर खासदार होणार आहे. माजी खासदार नीलेश राणे आणि नारायण राणे हेसुद्धा केंद्राचे मंत्री म्हणून कोकणचे नेतृत्व करत आहेत, असे बाळ माने यांनी स्पष्ट केले.
या वेळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके, उत्तर भारतीय आघाडीचे प्रमुख मुकेश गुप्ता, माधवी माने, सुजाता साळवी, सायली बेर्डे, शिवानी सावंत, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, युवा नेते मिहीर माने, मनोज पाटणकर, नितीन जाधव, अमित विलणकर यांच्यासमवेत शहर पदाधिकाऱ्यांनी रंगपंचमीचा उत्सव साजरा केला.