इंडिया टुडेच्या सर्वेक्षण क्रमवारीत सलग सातव्यांदा आंबवमधील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश…

Spread the love

देवरूख- इंडिया टुडे या प्रख्यात राष्ट्रीय मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतातील शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा भारतातील सर्वोत्तम खाजगी महाविद्यालयांच्या क्रमवारीत सलग सातव्यांदा पहिल्या २५० महाविद्यालयांमध्ये समावेश झाला आहे.

या सर्वेक्षणानुसार राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रात ३५ व्या क्रमांकावर असून मुंबई विद्यापीठात ११ व्या क्रमांकावर मानांकित झाले आहे. कोकणातील केवळ दोनच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा या राष्ट्रीय क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे. इंडिया टुडे या मासिकाने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये विविध निकषांच्या आधारे भारतातील महाविद्यालयांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. या निकषांनुसार महाविद्यालयाची सर्वांगीण माहिती, नॅक ऍक्रेडीटेशनची श्रेणी, प्रवेश प्रक्रिया, शिक्षण शुल्क, जमाखर्चाचा तपशील, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता व अनुभव, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिसंवादातील सहभाग आणि शोधनिबंध सादरीकरण, देशविदेशातील माजी विद्यार्थी कार्यरत असलेल्या नामांकित आस्थापनांची माहिती व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार, संदर्भग्रंथ आणि नामांकित नियतकालिकांनी समृद्ध ग्रंथालय, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा औद्योगिक जगताशी असणारा नियमित संपर्क आणि त्याद्वारे विद्यार्थी उद्यमशील होण्यासाठी केलेले प्रयत्न, विविध विषयावरील तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शन, महाविद्यालयाच्या आवारातील शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक सोयीसुविधा इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय क्रमवारी निश्चित करण्यात येते.

या सर्वेमधील इन्फ्रास्ट्रक्चर अँड लिविंग एक्स्पीरिअन्स या निकषामध्ये राजेंद्र माने महाविद्यालयाने महाराष्ट्रात पाचवा व मुंबई विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच ऍकॅडेमीक एक्सलेन्स या निकषामध्ये महाराष्ट्रात सव्वीसावा तर मुंबई विद्यापीठात सातवा क्रमांक प्राप्त केला आहे. कोकणातून या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अँड लिविंग एक्स्पीरिअन्स व ऍकॅडेमीक एक्सलेन्स या दोन्ही निकषांमध्ये माने अभियांत्रिकी महाविद्यालय पुन्हा एकदा सरस ठरले आहे. हे महाविद्यालय कोकण विभागातील एकमेव एन बी ए मानांकनप्राप्त असून मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाला पुढील तीन वर्षांसाठी NBA मानांकन मिळाले आहे. तसेच दुसऱ्यांदा झालेल्या नॅक मुल्यांकनामध्ये बी ++ ग्रेड प्राप्त केली आहे. इंजिनीअरिंग महाविद्यालयाची निवड करताना NBA आणि NAAC सारखी मानांकने अतिशय महत्वाची मानली जातात कारण अशा महाविद्यालयात उच्च दर्जाची पायाभूत सुविधा आणि चांगले शिक्षक आहेत असे सूचित केले जाते. विशेषतः NBA द्वारे वापरल्या जाणार्‍या प्रक्रिया, मापदंड आणि निकष सर्वोत्तम असून NBA मानांकनप्राप्त महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्याने रोजगार आणि संशोधनाच्या उद्देशाने ओळखण्यास मदत होते शिवाय कॅम्पस प्लेसमेंट मिळण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.

त्याहूनही अधिक, USA, UK सारख्या इतर देशांमध्ये इंजिनीअरिंगमधील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणे खूप सोपे होते. काही देशांमध्ये सध्या NBA मानांकनप्राप्त महाविद्यालयामधून पदवीधर झालेल्या इंजिनीअरनाच देशात राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी परवानगी देण्यात येते. यापूर्वीही महाविद्यालयाने ए आय सी टी इ –सीआय आय ने २०१६, २०१७ तसेच २०२० यावर्षी घेतलेल्या सर्वेक्षणात सुवर्ण श्रेणी प्राप्त केली होती. तसेच २०१८ चा आय एस टी इ चा बेस्ट कॅंपस अॅवार्ड या महाविद्यालयाने पटकावला होता. ‘आर वर्ल्ड इंस्टीट्युशन रँकिंग’ मध्येही महाविद्यालयाने स्थान मिळविले होते. या सर्वेक्षणामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना चांगले महाविद्यालय निवडणे सोपे जाणार आहे. पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधील महाविद्यालयांच्या तोडीचे दर्जेदार शिक्षण व सुविधा राजेंद्र माने सारख्या महाविद्यालयाने ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले असून अनेक विद्यार्थी स्थानिक पातळीवरील दर्जेदार उच्च शिक्षणाला व निसर्गरम्य कॅम्पसला पसंती देत आहेत. या सर्वेक्षणासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी पालकमंत्री श्री. रविंद्रजी माने , कार्याध्यक्षा सौ. नेहा माने , उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी,पालक आणि कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page