राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांबाबत निवेदने सादर करून मांडली आग्रही भूमिका.
मुंबई- राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांची भेट घेत राजापूर विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांविषयी विस्तृत चर्चा केली. राजापूर विधानसभा आजही ‘आकांक्षी’ क्षेत्र राहिले असून आपल्या सरकारच्या माध्यमातून विविध लेखाशीर्षांखाली भरीव निधी आल्यास येत्या ५ वर्षांमध्ये राजापूर क्षेत्र विकसित होईल. तसेच स्थानिक नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीमध्ये स्थित्यंतर घडून येईल अशा स्वरूपात आपली भूमिका मांडली.
▪️यामध्ये राजापूर, लांजा व साखरपा येथील विविध पर्यटनक्षेत्रांचा विकास व्हावा, स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी पर्यटन विकास निधी अंतर्गत भरीव विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन श्री. गिरीष महाजन यांना दिले. तसेच २५/१५ अंतर्गत निधी मंजूर करून स्थानिक विकास कामे मार्गी लावावीत अशी विनंती त्यांना केली. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विकास व संशोधन निधी अंतर्गत १५ किमी लांबीचे रस्ते मंजूर करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी सौ. विश्वासराव यांनी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागांतील रस्त्यांची सद्यस्थिती विषद केली.
▪️श्री. गिरीष महाजन यांनी संपूर्ण स्थिती जाणून घेत राजापूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्याचे आश्वासन सौ. उल्का विश्वासराव यांना दिले. तसेच आगामी काळात जास्तीतजास्त विकासकामांची पूर्तता करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश केले.