मौजे रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे तालुका क्रीडा संकुलच्या सन २०११पासून प्रलंबित असलेल्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष असलेल्या स्थानिक आमदारांच्या अनास्थेमुळे एक कोटी निधी मंजूर असताना देखील सदर प्रकल्पाचे काम मागील बारा वर्षे प्रलंबित होते. आमदार श्री. राजन साळवी यांनी सदर कामासाठी अधिवेशनात निधी मंजूर करून घेतल्याची बातमी काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध करून स्वतःचे अज्ञान दाखवून दिले होते.
मागील दोन वर्षे क्रीडा मंत्रालयात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांकडे मी स्वतः सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे राज्याच्या तालुका क्रीडासंकुल सुधारीत शासन निर्णयानुसार बांधकामासाठी रू.४९८.३० लक्ष निधीच्या अंदाजपत्रकाला राज्य क्रीडा समितीकडून तांत्रिक व मंत्रायातून प्रशासकीय मान्यता मिळाली. सदर कामासाठी आतापर्यंत अडीच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. प्रथम टप्प्यातील कामाचा कार्यारंभ आदेश ठेकेदाराला देण्यात आला आहे. सदर तालुका क्रीडा संकुलाच्या निधीसाठी राज्याचे सा.बा. मंत्री श्री. रवींद्र चव्हाण, आमदार श्री. प्रसाद लाड यांनी राज्याचे क्रीडामंत्री व आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व प्रत्यक्ष भेटून प्रयत्न केला आहे. राज्यातील भाजप- शिवसेना सरकारने क्रीडासंकुलाला निधी मंजूर करून राजापूर तालुक्यातील क्रीडा क्षेत्रासाठी भरीव कार्य केले आहे.
भाजप – शिवसेना सरकारच्या सदर कामाचे श्रेय घेण्यासाठी आमदार श्री. राजन साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवार दि. ३१ ऑगस्टला भूमिपूजनाची राजकीय नौटंकी केली. सदर भूमिपूजन अनधिकृत होते व वीस ते पंचवीस उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता. पालकमंत्री,लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाची पाटी लावून शासकीय कार्यक्रम असल्याचे भासविण्यात आले. परंतु शासनाचा एकही प्रतिनिधी,ज्या संस्थेने भूदान केले त्यांचा प्रतिनिधी तथा गावचे सरपंचसुद्धा उपस्थित नव्हते. मागील चौदा वर्षात विधानसभा क्षेत्रात कोणतेही भरीव कार्य केलेलं नसून वर्तमान सरकारने केलेल्या या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न हास्यास्पद असल्याची सर्वत्र चर्चा चालू आहे.
सदर क्रीडा संकुलाचा अधिकृत शासकीय भूमीपूजन कार्यक्रम पालकमंत्री मा. श्री. उदय सामंत यांच्या शुभहस्ते,भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार श्री. प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासन लवकरच आयोजित करणार असून त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.