
मुसळधार पावसातही जवाहर चौकासह राजापूर बाजारपेठेत शिरणारे पुराचे पाणी यावर्षी ध्वजस्तंभापर्यंतही पोहोचले नाही
राजापूर (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होवून जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र तुफान पाउस पडत असतानाही गेल्या अनेक वर्षातील राजापूरच्या डोक्यावर असणारी पुराची टांगती तलवार यावर्षी मात्र फारच कमी होती . जवाहर चौकासह राजापूर बाजारपेठेत शिरणारे पुराचे पाणी यावर्षी ध्वजस्तंबापर्यंतही आले नाही त्यामुळे पावसाळ्यापुर्वी झालेल्या गाळउपसामुळे राजापूरची वाटचाल पुरमुक्तीच्या दिशेने असल्याचे प्रकर्षाने दिसुन आले .
दरवर्षी पावसाचा जोर थोडासा वाढला तरी लगेच राजापूर बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा पडत असे मात्र यावर्षीच्या गेले दोन दिवस तुफानी पडणाऱ्या पावसात देखील पुराच्या पाण्याची जवाहर चौकात येइपर्यंत झालेली दमछाक पाहता राजापूरकरानी सुटकेचा निश्वास टाकला होता . रात्री उशीरा शहरातील जवाहर चौकात ध्वजस्तंभाच्याही खाली पाणी भरले होते . त्यामुळे दरवर्षी नागरिक व व्यापारी यांची पुरामुळे होणारी धावपळ यावेळी दिसुन आली नाही .
यावर्षीच्या जानेवारी महिण्यापासुन नाम फाउंडेशनच्या माध्यमातून राजापूर नगर परिषद व महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून कोदवली व अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात आला होता . राजापूर मधील नागरिकानाही या गाळ उपशाला सढळ हस्ते आर्थिक मदत केली असल्याने हे गाळ उपशाचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य नगर परिषद प्रशासनाला लाभले होते . नाम फाउंडेशनने पुढाकार घेत प्रथम कोदवली नदिपात्रातील गाळ मोठ्याप्रमाणात उपसा केला होता. तर शासनाच्या यांत्रिकी विभागाने जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या निधीतून अर्जुना नदीतील गाळ उपसा केला होता. त्याचा चांगला परिणाम यावर्षी दिसुन आल्याने राजापूरवासियान्मधुन नाम फाउंडेशन, नगर परिषद व महसूल प्रशासन याना धन्यवाद दिले आहेत .